तालुक्यातील न्हावेळी मोमवाडी येथे कुत्र्याच्या भक्ष्याकरिता लोकवस्तीत घुसलेला बिबटय़ा कठडा नसलेल्या विहिरीत कोसळला. त्याला वन विभागाच्या पथकाने बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले. हा बिबटय़ा मादी जातीचा, दीड ते दोन वर्षांचा असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. निगुडे या ठिकाणी एका बिबटय़ाने वासरावर हल्ला केला होता. त्यानंतर हा दुसरा बिबटय़ा न्हावेलीत विहिरीत सापडला. कुत्र्याच्या भक्ष्याकरिता त्याने पाठलाग केला, पण संरक्षक कठडा नसल्याने विहिरीत पडला. न्हावेली मोमवाडीतील नंदकिशोर कोचरेकर यांचा पाळीव कुत्रा जोरदार भुंकत होता. त्यामुळे रात्री २ वाजता घरातील मंडळींनी उठून लाइट लावला असता बिबटय़ा पळाला होता. पण सकाळी विहिरीत डोकावून पाहतात तर विहिरीच्या पाण्याजवळ एक बोगदा होता. त्यात बिबटय़ा बसलेला आढळला. वन खाते व पोलिसांना माहिती कळताच सर्वानीच धाव घेतली. त्यानंतर या बिबटय़ाला विहिरीतून बाहेर काढून जेरबंद करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.