येथील वडाळी वनपरिक्षेत्रातील भवानी तलावाजवळ बिबटय़ाचे शावक मृतावस्थेत आढळून आले. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात या शावकाचा मृत्यू झाला असावा, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. या बिबटय़ा शावकाच्या शरीरावर चावे घेतल्याच्या खुणा आहेत.

अमरावतीपासून जवळच असलेल्या वडाळीच्या जंगलात अनेक बिबटय़ांचा वावर आहे. या बिबटय़ांमध्ये अधिवास क्षेत्राच्या हद्दीवरून अनेकवेळा संघर्ष उद्भवत असतात. यातूनच एखाद्या बिबटय़ाने या शावकावर हल्ला केला असावा, असे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. रविवारी सकाळी भवानी तलावाजवळ मोकळया जागेत बिबटय़ाचे शावक मृतावस्थेत आढळून आले. याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. वनकर्मचाऱ्यांनी पाहणी केली, तेव्हा शावकाच्या शरीरावर चावा घेतल्याच्या खुणा होत्या. बिबटय़ाच्या शावकाचे शवविच्छेदन करण्यात आले असून उद्या सोमवापर्यंत अहवाल अपेक्षित आहे. त्यातून मृत्यूचे कारण कळू शकेल, पण बिबटय़ाच्या हल्ल्यातच या शावकाचा मृत्यू झाला असावा, असे प्रथमदर्शनी दिसून येते, असे हेमंतकुमार मीना यांनी सांगितले.

वडाळी आणि चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात तब्बल ३० बिबटय़ांचे अस्तित्व असल्याचा दावा एका संस्थेने केला होता. शहरालगत सुमारे २१ हजार हेक्टरमध्ये या वनपरिक्षेत्राचा विस्तार आहे. जैवविविधतेने परिपूर्ण अशा या जंगलात वाघाचेही अस्तित्व दिसून आले आहे.

या जंगलात वन्यप्राणी-मानव संघर्षांच्या फारशा घटना नाहीत, तरी अलीकडच्या काळात बिबटय़ांचे दर्शन सातत्याने होत असल्याने एसआरपीएफ, विद्यापीठ, तपोवन, वडाळी परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. यंदा पाणवठय़ांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी असल्याने बिबटय़ांचा शहरातील निवासी भागात प्रवेश झालेला नाही. वडाळीच्या जंगलात मृतावस्थेत आढळून आलेल्या शावकाच्या शिकारीची शक्यता वन कर्मचाऱ्यांनी फेटाळून लावली आहे.