तालुक्यातील रवळजी येथील विहिरीत पडलेल्या बिबटय़ास शर्थीच्या प्रयत्नांनंतर वाचविण्यात कळवण वन विभागाला यश आले. बिबटय़ाला पुढील कार्यवाहीसाठी नाशिक येथे पाठविण्यात आल्याची माहिती वनक्षेत्र अधिकारी आर. एम. ढोमसे यांनी दिली.
रवळजी शिवारातील राजाराम पालवी यांच्या विहिरीत रात्री बिबटय़ा पडला. सकाळी पालवी हे पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीजवळ मोटार सुरू करण्यासाठी गेले असता विहीरीतून बिबटय़ाचा आवाज ऐकू आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना बिबटय़ाचे दर्शन झाले. त्यांनी कळवण येथील वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली. कळवण वन विभागाचे पथक तत्काळ विहिरीजवळ पोहचले. पथकाने अनेक प्रयत्न करूनही बिबटय़ाला विहिरीबाहेर काढण्यात यश आले नाही. अखेर येवल्याहून दुपारनंतर पिंजरा आणण्यात आला. शर्थीच्या प्रयत्नानंतर सायंकाळी बिबटय़ाला काढण्यात यश आले. विहिरीत बिबटय़ा पडल्याचे कळल्यानंतर नागरिकांनी बिबटय़ाला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.