कुष्ठरुग्ण म्हणून कुटुंबीयांनी दूर लोटलं. सामाजिक बहिष्कार अजूनही आहेच. वर्तमान किळसवाणे आणि भवितव्य भीतिदायक, असे शापित जीवन जगणाऱ्या कुष्ठरुग्णांच्या मतदानाचा अधिकारही आता हिरावून घेतला जात आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश देऊनही त्यांच्या मतदानाची सोय काही झाली नाही. त्यामुळे हातांच्या झडलेल्या बोटांकडे पाहात ही मंडळी ‘सांगा, आम्ही शाई कोठे लावायची’ असा सवाल प्रशासनालाच विचारत आहे.
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर उस्मानाबाद शहरालगत ‘मधुबन कुष्ठधाम’ असा मोडकळीस आलेला फलक. शासकीय तंत्रनिकेतन प्रशालेच्या सुसज्ज इमारतीच्या बाजूने ओबडधोबड पायवाट आहे. तोच या कुष्ठधामचा रस्ता. येथे २४ कुष्ठरुग्ण राहतात. त्यांच्यासाठी शासकीय पातळीवरून घेतली जाणारी ‘काळजी’ अवर्णनीयच. सर्वानाच मतदानाचा अधिकार. केव्हा ना केव्हा गावाकडे मतदान केले असल्याचेही ते सांगतात. पण येथे आल्यापासून कोणी मतदानासाठी घेऊन जाण्यास आले तरच जातो, असे बार्शी तालुक्यातील कारी गावचे रामिलग भराडे सांगतात.
कुष्ठरुग्णांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार अशा रुग्णांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र असावे, असे आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. आचारसंहितेच्या काळात अचानक गतिमान झालेल्या प्रशासनाच्या मात्र ते गावीही नाही. निवडणूक निरीक्षकांच्या निरीक्षणातूनही कुष्ठरुग्ण आपसूक सुटून गेले. त्यामुळे हे २४जण भारताचे नागरिक नाहीत काय? मग त्यांचा मतदानाचा अधिकार का हिरावून घेतला जातोय, याचे उत्तर कोणाकडेच नाही.
मतदार चिठ्ठी वाटण्याचे काम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे. येथील एकाही कुष्ठरुग्णाला मतदार चिठ्ठी मिळाली नाही. मतदान जागृती अभियानाचा भोंगा इकडे फिरकलाही नाही. एवढेच काय, ज्यांना मत हवे आहे ते ‘साहेब’, ‘दादा’, ‘भाऊ’, ‘भया’, ‘सर’ यापकी कोणीच त्यांच्याकडे मतासाठी विनवणी करण्यास आले नाहीत. देशाच्या भवितव्याचा निर्णय घेणाऱ्या निवडणुकीची धांदल सुरू आहे, याचा त्यांना थांगपत्ताही नाही. स्वयंपाक करणारी बाई तासभर सरपण नाही, म्हणून ताटकळते. सरपण मिळाले नाही तर आजही उपवास घडणार, ही चिंता त्यांना निवडणुकीपेक्षा जास्त भेडसावते. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार याचे त्यांना सोयरसुतक नाही.
शहराच्या ख्वाजानगर भागातील मेहताब हसन शेख २० वर्षांपासून येथे राहतात. आता त्यांची दृष्टी अधू झाली. मतदान करणार का? असा सवाल केल्यावर ते म्हणाले, ‘खुद ऊठ के खाना भी नही खा सकता, मतदान कैसे करू, और किया भी तो शाई कहाँ लगाओगे?’ असे म्हणत त्यांनी हात वर करून झडलेली बोटे समोर धरली.
उमरगा तालुक्यातील कसगी येथील लक्ष्मण नागप्पा पलवान यांनी ‘विष खायला पसे नाहीत, गावाकडे मतदानाला कसा जाऊ?’ असा सवाल केला. बार्शी येथील भारत रघुनाथ सातपुते यांची अवस्थाही याहून वेगळी नव्हती. प्रचाराच्या तोफा थंडावल्या. गुरुवारी मतदान होईल. मतमोजणीनंतर कोणी उमेदवार २४ मतांनी पराभूत झालाच, तर या शापित निराश्रितांची आठवण तेव्हा मात्र नक्की तीव्र होईल.