महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘व्हिजन डाक्युमेंट’ तयार करताना त्यात सोलापूरला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न राहणार असून या वस्त्रोद्योग नगरीत ‘टेक्स्टाईल हब’ बनविण्याचे नियोजन करू, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य व सोलापूर दक्षिण या तीन मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रचारार्थ सात रस्त्यावरील संगमेश्वर महाविद्यालयाजवळील मैदानावर आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरूरकर, सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्यासह जिल्हाप्रमुख लक्ष्मीकात ठोंगे-पाटील, शहर प्रमुख प्रताप चव्हाण व पक्षाचे उमेदवार महेश कोठे (शहर मध्य), उत्तमप्रकाश खंदारे (शहर उत्तर) व गणेश वानकर (सोलापूर दक्षिण) यांची उपस्थिती होती. जिल्ह्य़ातील सांगोला, पंढरपूर, अकलूज आदी ठिकाणीही ठाकरे यांच्या सभा झाल्या. त्यानंतर रात्री त्यांची शेवटची सभा सोलापुरात पार पडली.
आपल्या २० मिनिटांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवरील टीका टाळून विकासाच्या मुद्यांवर भर दिला. सोलापूर हे एकेकाळी राज्यातील चौथ्या क्रमांकाचे शहर होते. ते मागे का गेले, स्थानिक नेतृत्वाने कोणती जबाबदारी पार पाडली, वस्त्रोद्योगाची वाताहात का झाली, असे सवाल उपस्थित करीत ठाकरे यांनी, राज्यात शिवसेनेच्या हाती स्वयंपूर्ण सत्ता आल्यास सोलापुरात ‘टेक्स्टाईल हब’ तयार करून सर्वागीण विकास साधला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. हवेतील गप्पा मारणाऱ्यांपैकी आपण नाही. दूरदृष्टी ठेऊन प्रत्येक बाबीचा सखोल अभ्यास करूनच आपण जबाबदारीने बोलतो, असे ते म्हणाले.
यावेळी नेरूरकर, बरडे यांच्यासह उमेदवार खंदारे, कोठे, वानकर आदींची भाषणे झाली. महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड यांचेही भाषण झाले.