मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तिरकस पत्र लिहीत माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी पक्षात मी नको असेन तर मला नोटीस देऊन काढून का टाकत नाही, असा सवाल केला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नोकरचाकरांप्रमाणे वागणूक देत पक्षात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्री ‘प्रोपरायटर’ म्हणून कार्यरत असल्याची टीका त्यांनी एका पत्रान्वये केली आहे. हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले असल्याचे पवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. उत्तमसिंह पवार लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून इच्छुक होते. त्यांना उमेदवारी नाकारताना विधान परिषदेवर नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन देऊन थांबविण्यात आले होते. ही नियुक्ती मिळाली नसल्याने ते नाराज आहेत.
काँग्रेसमधील ‘वारसा’हक्काने मिळणाऱ्या राजकीय वरदहस्तावरही भाष्य करत उत्तमसिंह पवार यांनी विधान परिषदेत त्यांना डावलल्याची कारणे विचारली आहेत. ते म्हणतात, ‘माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना शंकरराव चव्हाणांचा, राजीव सातव यांना त्यांच्या मातोश्री रजनी सातव यांचा, औरंगाबाद येथील लोकसभेतील उमेदवार नितीन पाटील यांना त्यांचे वडील सुरेश पाटील यांचा, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांच्या मुलासही केवळ वारसा म्हणूनच उमेदवारी मिळाली. राजेंद्र दर्डा, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, राजेंद्र मुळक यांनाही नात्यातल्या आशीर्वादाचाच राजकीय वरदहस्त आहे.’ वारसांची अशी यादी देतानाच राज्यपाल नियुक्त सदस्यत्वेसाठी माझ्या नावाचा विचार केवळ मी जातीने मराठा नाही म्हणून केला जात नाही का, असा सवालही पवार यांनी केला आहे.
औरंगाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय मेळाव्यात उत्तमसिंह पवार यांच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्यात आले होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा जयघोष करणाऱ्या कार्यकर्त्यांना जवाहरनगर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले होते. याचाही राग या पत्रात तिरकसपणे व्यक्त करण्यात आला आहे.