नव्या सार्वजनिक ग्रंथालयांना शासनाने लवकरात लवकर मान्यता द्यावी, ग्रंथालयांचे अनुदान दुप्पट करावे यांसह विविध ठरावांना मान्यता देत वार्षकि ग्रंथालय अधिवेशन झाले. अधिवेशनास सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी मार्गदर्शन केले तर अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.आ.ह.साळुंखे यांनी ग्रंथालय नसलेले गाव ज्ञानाच्या दृष्टीने कुपोषित असते, असे सांगून गाव तेथे ग्रंथालय स्थापन केलेच पाहिजे असे प्रतिपादन केले.
सातारा येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या सभागृहात ग्रंथालय संघटनेचे अधिवेशन झाले. या एक दिवसीय अधिवेशनात सार्वजनिक ग्रंथालयाच्या सध्यस्थितीबद्दल चर्चा करण्यात आली. शासनाने सार्वजनिक ग्रंथालयांकडे जाणीवपूर्वक लक्ष देत अनुदानात वाढ केली पाहिजे तसेच ग्रंथालयांनी वाचकांना पुस्तकांबरोबर अत्याधुनिक सेवा सुविधा पुरवल्या पाहिजेत असा सूर या अधिवेशनात उमटला.
संमेलनात नव्यानी येऊ घातलेल्या मात्र शासनाने अद्याप मान्यता न दिलेल्या ग्रंथालयांचा विषय तातडीने सोडवावा, त्यांना मान्यता द्यावी तसेच ज्या ग्रंथालयांच्या दर्जा वाढीचे प्रस्ताव शासनकडे प्रलंबित आहेत. त्यांना मान्यता द्यावी तसेच शासनाने २०१२ सालात अनुदानात ५० टक्के वाढ केली होती. ती वाढ आता दुप्पट करावी असाही ठराव करण्यात आला. ज्या ग्रंथालयांकडे स्वतच्या मालकीच्या जागा नाहीत त्यांना ग्रामपंचायत, नगरपालिका अथवा शासनाने अशा जागा द्यावी. शासनाने ग्रंथालयांना दूरदर्शन संच, संगणक संच, त्यासाठी ग्रंथालयाचे सॉफ्टवेअर प्रत्येक ग्रंथालयास द्यावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाव तेथे ग्रंथालय या साठी राज्यस्तरीय ग्रंथालय आयोगाची स्थापना करावी, असे ठराव यावेळी टाळ्यांच्या गजरात मंजूर  करण्यात आले.
यावेळी डॉ.आ.ह.साळुंखे यांनी केलेल्या मार्गदर्शनात, आज माहितीची उपलब्धता मोठय़ा प्रमाणार आहे. मात्र माहिती गाळून, योग्य आहे का याची खातरजमा करून घेतली पाहिजे.अन्यथा न पचलेल्या अन्नामुळे जशी शारीरिक हानी होते तशी मानसिक आणि बौध्दिक हानी होईल. माहिती तंत्रज्ञानामुळे माहिती मिळत असली तरी प्राथमिक पातळीवर प्रत्येक गावात ग्रंथालय पाहिजे. आज देशात अनेक कुटुंबांना ग्रंथालये माहीत नाहीत, ग्रंथ माहीत नाहीत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे. ग्रंथपालांचे काम या साठी अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ गंथांची किंमत पाहून ग्रंथ खरेदी करण्याऐवजी आशयघन ग्रंथ ग्रंथालयात आले पाहिजेत याचा विचार त्यांनी केला पाहिजे. चांगले ग्रंथ हे गुरू असतात, मित्र असतात.
मात्र अहितकारक ग्रंथ शत्रूही ठरतात. हे समजावून घेतले पाहिजे. ज्यामुळे स्वातंत्र्याचा,समतेचा संकोच होतो असे वाचन, गंथ बाजूला केले पाहिजेत असे डॉ.साळुंखे म्हणाले. ग्रंथालय विभागाचे संचालक सुभाष राठोड, धरमसिंह माळी यांनी ग्रंथपालांच्या शंकांचे निरसन केले.
उद्घाटनप्रसंगी श्रीनिवास पाटील यांनी, गावोगावी ग्रंथालये आणि ग्रंथ सहज, सुलभपणे उपलब्ध व्हायला पाहिजेत असे सांगितले. गावागावात शासकीय अधिकारी असतात. मीही शासकीय अधिकारी होतो. अशा कामांसाठी निधी, जागा उपब्ध करून देणे किती जिकिरीचे असते हे मला माहीत आहे. मात्र या विषयाचे प्रेम असणाऱ्या अधिकाऱ्याला यातूनही मार्ग काढून अडचणींवर मात करता येते असे सांगितले. यावेळी ग्रंथ अधिवेशनाचे निमंत्रक संभाजीराव पाटणे यांनी प्रस्तावना केली आणि अधिवेशनाचा हेतू स्पष्ट केला. अधिवेशनास सुमारे दोनशेहून अधिक ग्रंथालयांचे ग्रंथपाल उपस्थित होते.