महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ अधिक आहे. गेल्या चार-पाच वषार्ंत विदेशी पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र, विदेशी पर्यटकांच्या संस्कृतीचाच एक भाग असलेल्या दारूवर या जिल्ह्य़ात बंदी घोषित झाल्याने विदेशी पर्यटकांचा ओघ कमी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी पाच व्याघ्र प्रकल्प एकटय़ा विदर्भात आहेत. त्यातही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या अधिक असल्याने आणि सहजरीत्या होणाऱ्या व्याघ्र दर्शनामुळे भारतीय पर्यटकांसह विदेशी पर्यटकांचा ओढा गेल्या काही वर्षांत वाढला आहे. ताडोबात येणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी विदेशी पर्यटकांची संख्या सुमारे २० टक्के इतकी आहे. हा पर्यटक पर्यटनादरम्यान व्याघ्र प्रकल्प परिसरातील रिसॉर्टमध्ये वास्तव्यास असला तरीही नागपूरच्या विमानतळावरून तो पहिल्यांदा चंद्रपुरात येतो आणि येथून तो ताडोबाकडे रवाना होतो. दारू आणि मांस हा विदेशी लोकांच्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. अशा परिस्थितीत त्यावरच बंदी आणल्यास व्याघ्र पर्यटनावर त्याचा परिणाम होणार नाही का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
या व्याघ्र प्रकल्पात भारतातील आणि विदेशी पर्यटकांसाठी असलेले प्रवेश शुल्क, कॅमेरा शुल्क यामध्ये बरीच तफावत आहे. भारतीय पर्यटकांपासून जेवढा महसूल मिळतो, त्याच्या जवळपास २० टक्के महसूल विदेशी पर्यटकांपासून मिळतो. त्यामुळे या बंदीने महसुलावरही परिणाम होणार आहे. दारूबंदी लागू व्हायची असली तरीही त्याची माहिती विदेशी पर्यटकांपर्यंत आतापासूनच पोचवणे गरजेचे आहे. वनखात्याच्या संकेतस्थळावरूनसुद्धा अशी सूचना अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही. त्यामुळे येताना या पर्यटकाने सोबत दारू आणल्यास आणि वाटेत तपासणी झाल्यास हा पर्यटक पकडला जाऊ शकतो. त्यामुळे एकीकडे विदेशी पर्यटकांना आमंत्रित करायचे आणि दुसरीकडे त्यांना दारूबंदीची सूचना न देता दारू हाताळण्याच्या नावाखाली शिक्षा करायची, असा प्रकार घडण्याची शक्यता आहे.

‘पर्यटकांना सूचित करावे’
कान्हा आणि बांधवगडकडे येणारा पर्यटक ताडोबाकडे वळवण्याच्या गोष्टी करतानाच, त्या पर्यटकाच्या खाद्य संस्कृतीपासून त्याला वंचित ठेवण्याचा प्रकार पर्यटकांना दुरावणारा आहे. त्यामुळे या विदेशी पर्यटकाला किमान या दारूबंदीविषयी सूचित तरी केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी दिली.