नामांकित ब्रॅंडचा १ कोटी रुपयांचा विदेशी मद्यसाठा हरियाणा राज्यातून महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडवून मुंबईकडे नेला जात असताना मालेगाव येथे महामार्गावर पकडण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नाशिक-मुंबई-आग्रा महामार्गावर मंगरूळ फाट्याजवळ ही कारवाई केली. पथकाने ट्रकचालकास यावेळी अटक केली.

[jwplayer 6MSZQPVA]

हा मद्यसाठा लपवण्यासाठी वॉटर फिल्टर यंत्राचा वापर करण्यात आल्याचे कारवाईत उघडकीस आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत या कारवाई बाबत माहिती दिली. मुजीब जवान, धनंजय भदरगे, उदय शिंदे, दीपक पाटील यांच्या पथकाने मंगरूळ फाट्याजवळील हॉटेल साईलिलासमोर सापळा रचला. माल ट्रक थांबवून तपासणी केल्यानंतर शेवाळे यांनी ट्रकमधील वॉटर फिल्टर मशिन उघडताच विविध कंपनीचे मद्यांचे ८६३ बॉक्स दिसून आले.

मद्यासह ट्रक असा सुमारे १ कोटी ६३ हजार ६२० रूपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. चालक हरविंदरसिंग परमानंदसिंग याला पोलिसांनी यावेळी ताब्यात घेण्यात आले. महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ येत असल्याने या पार्श्वभूमीवर हा मद्यसाठा सापडल्याने हा विषय जिल्ह्याभरात चर्चेचा विषय बनला आहे.

या संदर्भात उत्पादन शुल्क आयुक्त श्रीमती व्ही. राधा, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, जितेंद्र गोगावले, चारूदत्त हांडे आदी अधिकार्‍यांचे तपासासंदर्भात मार्गदर्शन घेण्यात आल्याचे श्री. शेवाळे यांनी सांगितले.

[jwplayer e2jd58H5]