रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण करणाऱ्या यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे वाड:मयीन पुरस्कार जाहीर झाले असून पुरस्कारांसाठी संध्या नरे-पवार, महेंद्र कदम, संतोष शिंत्रे, रमेश चिल्ले यांच्या साहित्यकृतींची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा दाते स्मृती संस्थेचा आद्य कादंबरीकार बाबा पद्मनजी साहित्य पुरस्कार सोलापूर जिल्ह्य़ातील टेंभुर्णी येथील महेंद्र कदम यांच्या ‘आगळ’ या मुंबईच्या लोकवाड:मयगृहने प्रकाशित कादंबरीला जाहीर झाला आहे. कदम यांची ‘तो भितो त्याची गोष्ट’, ‘धूळपावलं’, ‘कवितेची शैली’ ही वैविध्यपूर्ण पुस्तके व समीक्षाग्रंथ प्रसिध्द आहेत. शिक्षणमहर्षी बापूरावजी देशमुख कथासंग्रह पुरस्कार पुणे येथील संतोष शिंत्रे यांच्या मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस प्रकाशित ‘गुलाबी सिर-द पिंक हेडेड डक’ या पहिल्याच कथासंग्रहाला, तर संत भगवानबाबा काव्यसंग्रह पुरस्कार साक्षात प्रकाशनाने प्रसिध्द केलेल्या लातूरच्या रमेश चिल्ले यांच्या ‘मातीवरची लिपी’ या कवितासंग्रहाला देण्यात येणार आहे. त्यांचे अनेक कवितासंग्रह व बालकिशोर साहित्य प्रकाशित झाले आहे. पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र, असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
गेल्या वर्षांपासून सुरू करण्यात आलेला अंजनाबाई इंगळे तिगावकर स्मृती स्त्रीवादी साहित्य पुरस्कारासाठी लोकवाड:मयगृह प्रकाशित मुंबईच्या संध्या नरे-पवार यांच्या ‘डाकीण’ या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीत सक्रिय असणाऱ्या संध्या पवारांनी या संशोधनात्मक पुस्तकातून डाकीण-चेटकीण प्रथेला बळी पडलेल्या स्त्रियांची व्यथा मांडतानाच वर्तमान व्यवस्थेचाही वेध घेतला आहे. शालिनीताई मेघे व सुमती वानखेडे प्रायोजित दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय, विदर्भात श्रमिकांच्या हक्कांसाठी व सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी यांना हरीश मोकलकर स्मृती सामाजिक ऋण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. १ फे ब्रुवारीला पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.