सर्वांगिण विकासासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहता येणार नाही. सरकारमुळेच देशाची प्रगती होते असे नाही जनतेनेही सहभाग द्यायला हवा आणि परंपरेने मिळालेली अर्थव्यवस्था सुधारण्यास वेळ लागणारच, असे खडेबोल सरसंघचालक मोहन भागवत यांनी विरोधकांना सुनावले आहेत. ते नागपूरात विजयादशमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या(आरएसएस) कार्यक्रमावेळी बोलत होते.

मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात यावेळी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.  देशात सध्या उत्साहाचे आणि विश्वासाचे वातावरण असून सरकारने सुरू केलेल्या जन-धन, स्वच्छ भारत, सिलिंडर सबसिडी सोडण्याचे आवाहन या सर्व योजनांचे भागवत यांनी कौतुक केले. मोदींच्या कार्याचे कौतुक करतानाच भागवत यांनी व्होट बँकेच्या राजकारणापलीकडे विचार करणे गरजेचे असून देशातील सर्व नागरिकांसाठी लोकसंख्येबाबत समान धोरण असले पाहिजे, असा सल्ला सरकारला देऊ केला.

वाढत्या लोकसंख्येनुसार उत्पादन वाढवावे लागेल. कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी लोकभावना बनवावी लागेल. तसेच देशातील निवडणूक व्यवस्थेत बदल करणे गरजेचे असल्याचे भागवत यांनी सांगितले.  निवडणूक व्यवस्था हे भ्रष्टाचाराचे कुरण बनायला नको. लोकप्रतिनिधी खऱया अर्थाने लोकांसाठी निवडून येतील अशी व्यवस्था असायला हवी, असेही ते पुढे म्हणाले. शिक्षण व्यवस्थेच्या बाजारीकरणावर बोट ठेवून भागवत यांनी शिक्षणाचे झालेलं व्यापारीकरण ही सर्वात भयंकर गोष्ट असल्याचे सांगितले. शिक्षणव्यवस्था समाजाधारित असायला हवी. आपले घर, समाज, तिथले वातावरण ही एक प्रकारची शाळाच असून तिथेही मुलांना योग्य शिक्षण मिळाले पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले. सीमारेषेवर पाकची शत्रूबुद्धी आणि चीनच्या विस्तारबुद्धीचा सामना करावा लागत आहे. इसिसचाही धोका आहे तर, देशांतर्गत दहशतवादाचेही संकट आहे. अशावेळी शांती, सुरक्षा, सुशासन ठेवण्यात सरकारची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचे भागवत यावेळी म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. दोघांनीही संघाच्या गणवेशात कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.  भारतातील विविध प्रांतातील स्वयंसेवक पथसंचलनासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. पथसंचलनानंतर शस्त्रपुजनाचा कार्यक्रम झाला व त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण झाले.