प्रथमच अस्तित्वात आलेल्या पनवेल महापा‌लिकेसह भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज (बुधवार) मतदान होत आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान सुरु राहील. त्याचबरोबर धारणी पंचायत समिती, नागभीड नगरपरिषद आणि नेवासा, रेणापूर व शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक, तसेच सात नगरपरिषदांतील ११ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होत आहे. शेकडो उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये कैद होणार आहे. सकाळी ९.३० पर्यंत पनवेलमध्ये १० टक्के, भिवंडीत १० ते ११ टक्के तर मालेगावमध्ये ९.३३ टक्के मतदान झाले होते.

तिन्ही महानगरपालिकेच्या एकूण २५२ जागांसाठी १ हजार २५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. एकूण १२ लाख ९६ हजार २६ मतदारांसाठी १ हजार ७३० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. भिवंडी आणि मालेगाव महापालिकेतले काही प्रभाग हे संवेदनशील आहेत. त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणेची करडी नजर असणार आहे.

पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. पनवेलमध्ये ७८ जागांसाठी (४१८), भिवंडी-निजामपूरमध्ये ९० जागांसाठी (४६४) तर मालेगावात ८४ जागांकरिता ३७३ उमेदवार रिंगणात आहेत. तिन्ही महापालिकांच्या एकूण २५२ जागांकरिता १२५१ उमेदवार आपले नशीब आजमवीत आहेत. पनवेलमध्ये भाजप विरुद्ध शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत होत आहे. कोकणातील तीन जिल्ह्य़ांमध्ये फक्त पनवेलमध्ये भाजपचा आमदार निवडून आला आहे. यामुळेच भाजपला येथे सत्तेची अपेक्षा आहे.

मुस्लीमबहुल मालेगावमध्ये भाजपने २७ उमेदवार उभे केले असून, त्यात १४ महिलांचा समावेश आहे. तलाकच्या विरोधात भाजपने घेतलेल्या भूमिकेचा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत फायदा झाला होता. मालेगावमध्ये तलाकच्या मुद्दय़ावर मुस्लीम महिलांची सहानुभूती मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मालेगावमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीतच लढत होण्याची चिन्हे आहेत. जव्हार, श्रीवर्धन, चिपळूण, कसई-दोडामार्ग, धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु., औसा आणि अचलपूर या ७ नगरपरिषद/ नगरपंचायतींतील एकूण ११ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होईल.