नाशिक जिल्ह्य़ात पक्षाची कोणतीही गटबाजी खपवून घेतली जाणार नाही. गटबाजी झाल्यास कोणत्याही परिणामांची पर्वा न करता ती मोडून काढण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख आ. अजय चौधरी यांनी तालुक्यातील घोटी येथे शिवसेना मेळाव्यात दिला. संपर्कप्रमुखपदावर निवड झाल्यानंतर चौधरी यांच्या उपस्थितीत जिल्ह्य़ात प्रथमच मेळावा झाला.
आगामी काळात जिल्ह्य़ात सिंहस्थ पर्वणी, महापालिका निवडणूक, नगरपालिका निवडणुका असल्याने जिल्ह्य़ात पुन्हा भगवामय वातावरण निर्माण करण्यासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी समर्थ साथ द्यावी, असे आवाहनही चौधरी यांनी केले. मेळाव्यात चौधरी यांनी आगामी काळातील कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर करतानाच तीन वर्षांसाठी पक्षवाढीकरिता त्रिसूत्री जाहीर केली. संघटनेला मजबूत करणारा सैनिकच पक्ष वाढवतो. जिल्ह्य़ात आपण नेता म्हणून नव्हे, तर सहकारी म्हणून आलो असून आपण सर्वानी एकजुटीने आगामी काळातील निवडणुका जिंकल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. पुढील तीन वर्षांच्या वाटचालीत मजबूत संघटन, लोकाभिमुख उपक्रम, संघटनात्मक आंदोलने या त्रिसूत्रीच्या माध्यमातून जिल्ह्य़ात प्रत्येक घरी सेना उभी करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. मेळाव्यास जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, खा. हेमंत गोडसे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार शिवराम झोले, त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख समाधान बोडके, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, नाशिक महानगरप्रमुख अजय बोरस्ते, महिला आघाडी नेत्या सत्यभामा गाडेकर आदी उपस्थित होते.