अवघ्या साठ दिवसांवर येणाऱ्या साहित्य महामंडळाच्या पदांसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आतापासूनच साठमारी सुरू झाली आहे. परिषदेच्या प्रत्येकालाच महामंडळाचा प्रतिनिधी होण्याची इच्छा असल्यामुळे बाजारात तुरी असतानाही बैठकीमध्ये वादळी चर्चा झाली.
अध्यक्षपदासाठीचे दावेदार असलेले दोन प्रमुख पदाधिकारी आणि त्यांच्या समर्थकांमध्ये अक्षरश: वादावादी झाली. काही वेळा तर, प्रसंग अगदी हमरीतुमरीवर आल्यामुळे ही बैठक गाजली.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय तीन वर्षांसाठी एक एप्रिलपासून पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे येत आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी आणि आगामी तीन महिन्यांच्या प्रकल्पांना मान्यता घेण्यासाठी परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक रविवारी झाली. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचीच या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
साहित्य महामंडळाची घटना यासंदर्भात संदिग्ध असल्यामुळे साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि प्रमुख कार्यवाह हे महामंडळाच्या भावी अध्यक्षपदासाठीचे दावेदार आहेत.
एरवीच्या बैठकांना कार्यकारिणीचे सदस्य फारसे उपस्थित रहात नाहीत असा अनुभव असताना या बैठकीला सर्व सदस्य झाडून हजर होते. त्यामुळेच एका तासामध्ये आटोपणारी ही बैठक चर्चा, वाद-विवाद यामुळे तब्बल चार तास चालली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या घटनेनुसार कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोशाध्यक्ष हे तीन प्रमुख पदाधिकारी हेच साहित्य महामंडळाचे पदाधिकारी होतात. तर, साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार घटक संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि प्रमुख कार्यवाह यापैकी परिषदेने नियुक्त केलेले तीनजण हे साहित्य महामंडळाचे पदाधिकारी होऊ शकतात.
यासंदर्भात महामंडळाची घटना संदिग्ध असल्यामुळे परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आणि प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी हे दोघेही अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.