देवदेवस्कीच्या संशयातून कळंबस्ते (ता. संगमेष्टद्ध (२२४) वर) येथील वृद्धाचा कोयत्याने निर्घृण खून करणाऱ्याला, न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. परिस्थितीजन्य पुरावे असतानाच पोलिसांच्या श्वान पथकातील ‘सम्राट’ने आरोपीला पकडून त्याच्याविरोधात भक्कम पुरावा उभा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रदीप मनोहर भाटकर (३८, रा. तेलीवाडी-कळंबस्ते) असे त्या आरोपीचे नाव आहे. खुनाचा हा प्रकार १८ जानेवारी २०१५ ला सायंकाळी साडेसहा ते रात्री १० वाजण्याच्या सुमारास कळंबस्ते-उंबरे रोडवर मळदेवाडी फाटय़ाच्या अलीकडे घडला. प्रदीप भाटकर याने चार ते पाच महिन्यांपूर्वी फिर्यादी वीरधवल पाटील यांचे वडील मयत सुधाकर यशवंत पाटील (६५, रा. कळंबस्ते) यांच्या घरी जाऊन तुम्ही माझ्यावर देवदेवस्की करता त्यामुळे मी आजारी पडतो, अशा शब्दात भांडण करून तुम्हाला मी ठार मारून टाकीन अशी धमकी दिली होती. मृत सुधाकर पाटील यांचा उंबरे येथे गावठी दारूचा व्यवसाय होता. १८ जानेवारीला प्रदीप भाटकर याने पाटील यांचा उंबरे ते कळंबस्ते पायवाटेने जाताना पाठलाग केला. मळदेवाडी दरम्यान पाटील एकटे असल्याचे पाहून त्यांच्यावर झडप घातली. डोक्याच्या मागील बाजूस धारदार कोयतीने दोन ते तीन सपासप वार केले. डोक्यावर वर्मी घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचा मुलगा वीरधवल पाटील यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीवरून पोलीस निरीक्षक एम. आर. चिखले यांनी संशयितावर गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खून प्रकरणात परिस्थितीजन्य पुरावे होते. त्यात मयताचे कपडे, त्यावरील रक्ताचे डाग, चप्पल आणि त्यावरील रक्ताचे डाग यांचा समावेश होता. त्याला जोड मिळाली ती पोलिसांच्या श्वान पथकाची. पदकविजेता श्वान ‘सम्राट’ याने आरोपीच्या घरात जाऊन दोनवेळा त्याचा शोध घेतला. हा पुरावा न्यायालयाने ग्राह्य़ धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. विनय गांधी व साहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले.