आज प्राथमिक फेरी; नऊ महाविद्यालयांचा सहभाग

राज्याच्या महाविद्यालयीन जगतात अल्पावधीत कमालीची लोकप्रिय झालेल्या ‘लोकसत्ता-लोकांकिका’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पध्रेच्या रत्नागिरी केंद्राची प्राथमिक फेरी आज रंगणार आहे.

येथील पटवर्धन हायस्कूलच्या भागोजी कीर सभागृहात सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या फेरीमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील मिळून नऊ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (शिल्पकोष्टक), अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय (दि किलर), डीबीजे महाविद्यालय (तातयांची कृपा), राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आंबव (रसिक), मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय, चाफे (मृगजळ), फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (मोक्ष); आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील संत राऊळमहाराज महाविद्यालय, कुडाळ (मैत) व श्री पंचम खेमराज वरिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी (घुसमट), तसेच रायगड जिल्ह्य़ातील महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (आम्ही तुझी लेकरे) या महाविद्यालयांचा समावेश आहे.  स्पध्रेच्या पहिल्याच वर्षी चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयाच्या ‘कबूल है’ या एकांकिकेने अंतिम फेरीत दुसरा क्रमांक पटकावला होता. तशाच प्रकारची किंवा त्याहून सरस कामगिरी करण्याची जिद्द बाळगून हे संघ यंदाच्या स्पध्रेत सहभागी होत आहेत. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी, पुणे’ आणि ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने होत असलेल्या या स्पध्रेची महाअंतिम फेरी ‘झी युवा’ वाहिनीवरून प्रक्षेपित होणार आहे.  ‘आयरिस प्रॉडक्शन’ या टॅलेंट पार्टनरचे विद्याधर पाठारे आणि विवेक रानवडे हे दोन प्रतिनिधी स्पध्रेच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अस्तित्त्व या संस्थेच्या सहकार्याने ही स्पर्धा राज्यभरातील आठ केंद्रांवर घेतली जात आहे.

नाशिकमध्ये आज चुरस

युवा वर्गाचे स्पंदन टिपणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धेची नाशिक विभागीय अंतिम फेरी ६ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता महाकवी कालिदास कला मंदिरात रंगणार आहे. प्राथमिक फेरीतील ‘पंचक’मधील संघ अंतिम फेरीत धडक मारणार याची उत्सुकता आहे.