युवा पिढीच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेच्या निमित्ताने या पिढीच्या प्रगल्भ सामाजिक जाणिवांचा आविष्कार अनुभवायला मिळाला.

राज्यातील आठ विभागीय केंद्रांपैकी रत्नागिरी केंद्राची प्राथमिक फेरी काल येथे पार पडली. त्यातून विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या पाच एकांकिकांपैकी कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘मैत’ या एकांकिकेत जुन्या काळातील सामाजिक उच्च-नीचता आणि उच्चवर्णीयांकडून अन्य समाजांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक नाटय़मय पद्धतीने मांडण्यात आली. महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘आम्ही तुझी लेकरे’ या एकांकिकेच्या माध्यमातून तर जातिभेद आणि आर्थिक विषमतेचे शाळकरी मुलांच्या संवेदनशील मनावर होणारे आघात अतिशय परिणामकारक पद्धतीने मांडले. मात्र त्यामुळे गोंधळून न जाता या परिस्थितीला सकारात्मक पद्धतीने सामोरे जात दिलेला प्रतिसाद मन हेलावणारा होता. या विद्यार्थी कलाकारांची ऊर्जाही थक्क करणारी होती. ‘शिल्पकोष्टक’ या रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकांकिकेतही जुन्या काळातील केशवपनाच्या अनिष्ट रूढीविरोधात बंड करू पाहणाऱ्या युवकाने केलेले बिनतोड सवाल अंतर्मुख व्हायला लावणारे होते. अंतिम फेरी गाठू न शकलेल्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘दि किलर’ या एकांकिकेतही राजकारण्यांची बुवाबाजी मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अशा प्रकारे समाजमनाला भेडसावणारे प्रश्न कलेच्या माध्यमातून मांडण्याची कोकणातील या युवा पिढीची धडपड स्पध्रेच्या परीक्षकांनाही अतिशय प्रभावित करून गेली. डॉ. अनिल बांदिवडेकर आणि निळकंठ कदम या दोन्ही परीक्षकांनी त्याबद्दल विद्यार्थ्यांची मुक्तकंठाने प्रशंसा करत, राज्याच्या कोणत्याही भागातील महाविद्यालयीन पातळीवरील एकांकिकेशी स्पर्धा करण्याची ताकद या एकांकिकांमध्ये असल्याचा अभिप्राय दिला.