लोकसत्ता लोकांकिका या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी औरंगाबाद आणि नागपूर या केंद्रांवरील सवरेत्कृष्ट एकांकिकांची निवड झाल्यानंतर आता शुक्रवारी अहमदनगर केंद्रावरील विभागीय अंतिम फेरी रंगणार आहे. सावेडी रस्त्यावरील माऊली सभागृहात होणाऱ्या या अंतिम फेरीत पाच एकांकिकांमधून अहमदनगर केंद्राची ‘लोकांकिका’ निवडली जाईल. ही एकांकिका महाराष्ट्राची लोकांकिका बनण्यासाठी इतर सात एकांकिकांसह महाअंतिम फेरीत संघर्ष करणार आहे.

नगर केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीत ११ लोकांकिका सादर झाल्या. त्यातील ‘वारुळातील मुंगी’ (न्यू आर्टस, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय, नगर), ‘प्रतिगांधी’ (बाळासाहेब भारदे महाविद्यालय, शेवगाव), ‘घुसमट’ (मालपाणी महाविद्यालय, संगमनेर), ‘ड्रायव्हर’ (पेमराज सारडा महाविद्यालय, नगर) आणि ‘तपोवन’ (अहमदनगर महाविद्यालय) या पाच लोकांकिका विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या. या लोकांकिका विभागीय अंतिम फेरीत सादर होतील. विभागीय अंतिम फेरीत प्रथम येणारी लोकांकिका १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. या फेरीसाठी रेणुका दप्तरदार, अभिजित क्षीरसागर व रुपाली देशमुख हे परीक्षक म्हणून काम पाहतील. शुक्रवारी सकाळी १० वाजता या विभागीय अंतिम फेरीला प्रारंभ होईल.

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणारी लोकसत्ता लोकांकिका ही स्पर्धा राज्यभरातील आठ केंद्रांवर घेण्यासाठी अस्तित्व या संस्थेची मोलाची मदत लाभली. या स्पर्धेसाठी रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएम, तर टेलिव्हिजन पार्टनर म्हणून झी मराठी नक्षत्र लाभले आहेत. या स्पर्धेतील प्रतिभावान कलाकारांना संधी देण्यासाठी आयरिस प्रॉडक्शन टॅलेण्ट पार्टनर म्हणून स्पर्धेसह असून नॉलेज पार्टनर म्हणून स्टडी सर्कल काम पाहणार आहे.