संपूर्ण वर्षांतील प्रमुख घडामोडींसह इतरही माहिती देणाऱ्या लोकसत्ताच्या ‘वर्धवेध’ या वार्षिक अंकाचे खान्देशात वाचकांकडून स्वागत करण्यात येत आहे. येथील जैन उद्योगसमूहाचे उपाध्यक्ष अशोक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वर्षवेध’चे सादरीकरणही झाले. स्पर्धेच्या युगात ‘वर्षवेध’ची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकते, असे मत या वेळी जैन यांनी मांडले. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, संशोधक या सर्वाना उपयुक्त अशी माहिती या अंकात आहे. सामान्यज्ञान आणि मागील वर्षांतील महत्त्वपूर्ण घटनांचा वेध घेण्यात आल्याने स्पर्धा परीक्षांसाठी तर हा एक विशेष असा संच आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण, सांस्कृतिक, क्रीडा, आर्थिक, सामाजिक अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांतील घडामोडींचा आढावा तारीखनिहाय या अंकात घेण्यात आलेला आहे. खान्देशात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने त्यांच्याकडून या अंकाची अधिक मागणी होत आहे. महत्त्वाच्या घडामोडींचे स्मरण होण्यासाठी नोंदवहीही उपलब्ध करून देण्यात आली असल्याने अंक संग्रही ठेवण्यासारखा झाला असल्याची प्रतिक्रिया वाचकांकडून व्यक्त होत आहे.जळगाव येथे ‘लोकसत्ता’च्या ‘वर्षवेध’ अंकाच्या सादरीकरणा वेळी जैन उद्योगसमूहाचे उपाध्यक्ष अशोक जैन यांच्यासह अनिल शिंदे.