खताच्या अपहारातील गुन्ह्याची चौकशी करताना पोलिसांनी शेतक-यांकडून मोठय़ा प्रमाणात पैसे उकळणे सुरू केले आहे. या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.
जळगाव येथील व्यापारी राजेंद्र रामदास खरे यांनी रेल्वे मालधक्क्यावर येणाऱ्या सरदार कंपनीच्या डीएपी या रासायनिक खताचा साठा औद्योगिक वसाहतीतील प्रतिभा एंटरप्राईजेसच्या या गोदामात केला होता. २७ जून २०१३ ते २७ जून २०१४ या कालावधीत ४४ हजार ५५० मेट्रिक टन खताची परस्पर विल्हेवाट लावली. ११ लाख १३ हजार रुपये किमतीच्या या मालाचा व्यवस्थापक दिनेश गोविंद देशपांडे (रा.बेलापूर खुर्द) याने अपहार केला होता. खरे यांनी शहर पोलीस ठाण्यात अपहार व फसवणूकप्रकरणी फिर्याद नोंदवली. देशपांडे यास पोलिसांनी नुकतीच अटक केली.
देशपांडे याने ग्रामीण भागात दलालांची नेमणूक केली होती. आमच्या कंपनीकडे स्वस्त दरातील डीएपी खत आहे. ते सबसिडीवर आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला स्वस्त दरात ते मिळवून देतो, असे दलाल सांगत असे. खोकर, उक्कलगाव, खंडाळा, रांजणखोल, बेलापूर भागांतील अनेक शेतक-यांना त्यांनी खत विकले. आता खत घेणाऱ्या शेतक-यांच्या मागे पोलिसांनी चौकशीचे शुक्लकाष्ट लावले. खताच्या गोण्या द्या किंवा त्याचे पैसे द्या, असा तगादा लावून गुन्ह्यात अटक करण्याच्या धमक्या पोलीस शेतक-यांना देत होते. १ हजार २०० रुपये किमतीची गोणी शेतक-यांनी ९०० रुपयांना घेतली होती. त्यांना हा चोरीचा माल आहे याची माहिती नव्हती. पण आता त्यांना अपहाराच्या गुन्ह्यात आरोपी करण्यात येईल, अशी धमकी पोलिसांकडून देण्यात येते. मोठय़ा प्रमाणात शेतक-यांकडून पोलीस पैसे उकळतात. २०० रुपये स्वस्तात घेतलेली गोणी आता शेतक-यांना ५ हजार रुपयांना पडत आहे. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.