मराठवाडयासाठी पाणीटंचाई निर्माण झाली नाही तर आश्चर्य वाटावे, असे वातावरण गेली अनेक वष्रे आहे. त्यामुळे एक हजार टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसा दर उन्हाळ्यातील नित्याची बाब झाली आहे. टंचाईच्या तीव्रतेची संवेदनाच हरवून बसावी, असे सध्याचे वातावरण आहे.
टँकर सुरू आहेत, मागणी होईल तेथे पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याच्या शुद्धतेविषयी कोणी काही विचारत नाही. सध्या नेहमीप्रमाणे ९७१ गावे आणि ३३९ वाडय़ांना टँकरची फेरी होते. गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने ही संख्या काहीशी कमी झाली आहे. मात्र, या वर्षी अजून तरी कोठे चारा छावणी उघडण्याची वेळ आली नाही. अवकाळीचा तेवढाच लाभ. मात्र, टंचाईत जनावारांना सांभाळणे दिवसेंदिवस अवघड होऊन बसले आहे.
या वर्षांत टंचाईवर ६१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. दरवर्षी टँकरवर होणारा हा खर्च कमी करता येईल का, याचा कोणी विचारच करीत नाही. गावनिहाय पाणी राखून ठेवण्यासाठी आराखडा तयार होत नाहीत. आता टंचाई उपाययोजना असा शब्द उच्चारला, तरी जलयुक्त शिवार असे एकच एक जालिम उत्तर प्रत्येकाला सांगितले जाते. या कार्यक्रमातून पाणलोटाची कामे कधी होणार, कधी त्या बंधाऱ्यात पाणी अडणार, या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यातच आहेत. त्यामुळे नित्याची पाणीटंचाई व नव्या योजना असे दरवर्षीचे वातावरण या वर्षीही आहे.
किती कोरडय़ा तलावांतून गाळ काढला, अशी नव्या आकडेवारीची त्यात भर आहे. दुसरीकडे गावोगावी बाईच्या डोक्यावर पाण्याचा हंडा आहे. टँकरचे पाणी विहिरीत वा आडात टाकले जात असल्याने आड, पोहरे, रहाट हे शब्द अजूनही परवलीचे आहेत. टँकरचा विळखा एवढा मजबूत कसा? कारण उसाच्या पिकात दडले आहे. ज्या जिल्हय़ात अधिक साखर कारखाने, त्या जिल्हय़ात अधिक टँकर अशी अवस्था आहे. परंतु टंचाईचे मूळ दुखणे कोणाला दूर करायचे नाही. पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविताना केले जाणारे गैरव्यवहार थांबविण्याची कोणतीही नवी यंत्रणा नव्या सरकारकडेही नाही. जुनाच कारभार दरवर्षीप्रमाणे सुरू आहे.
आकडेवारीत टंचाई
टँकरची संख्या १ हजार २५६
अधिग्रहण केलेल्या विहिरी ३ हजार १४४