राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच कोकण विभागातही यंदा पावसाची तूट सरासरीपेक्षा लक्षणीय प्रमाणात असून रत्नागिरी जिल्ह्य़ात गेल्या पाच वर्षांतील सर्वात नीचांकी पाऊस ऑगस्टअखेपर्यंत नोंदला गेला आहे.
यंदाच्या मोसमात जून आणि जुलै महिन्यातील मोजके दिवसवगळता पावसाचा प्रभाव अजिबात जाणवलेला नाही. अनेकदा संपूर्ण जिल्ह्य़ातील मिळून एकूण सरासरी पाऊस दोन आकडी संख्याही गाठू शकलेला नाही.
या पाश्र्वभूमीवर गेल्या पाच वर्षांतील सरासरी पावसाची नोंद पाहिली असता २०१० मध्ये ऑगस्टअखेर ३४५५ मिलिमीटर, २०११ मध्ये ४१३५ मिमी, २०१२ मध्ये ३०२५ मिमी, २०१३ मध्ये ३७४९ मिमी आणि गेल्या वर्षी ऑगस्टअखेपर्यंत २४९६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यंदा मात्र ३१ ऑगस्टपर्यंत फक्त १८९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी सुमारे एक हजार मिलीमीटर पाऊस जूनअखेर नोंदण्यात आला होता, ही बाब लक्षात घेतली तर सर्वात जास्त पावसाचे महिने मानले जाणाऱ्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये मिळून फक्त ८९६ मिलीमीटर पाऊस पडल्याचे आढळून येते. या दोन महिन्यांमध्ये सर्वसाधारणपणे प्रत्येकी १०००-१२०० मिलिमीटर पाऊस पडतो, असा अनुभव आहे. पण यंदा हे गणित चुकल्यामुळेच पावसाची एकूण तूट जास्त प्रकर्षांने जाणवत आहे.
पावसाळ्याच्या चार महिन्यांपैकी शेवटचा महिना आता सुरू झाला असून देशाच्या उत्तर भागातून मान्सूनचा पाऊस माघारी फिरण्यासही सुरुवात झाली आहे. तसेच जिल्ह्य़ात पावसासाठी अनुकूल वातावरण अजिबात जाणवत नाही.
अनेक ठिकाणी कडक ऊन किंवा हलके मळभ पडत आहे. गेल्या १ जूनपासून गुरुवारअखेर जिल्ह्य़ात एकूण सरासरी १९१२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ाचा सरासरी वार्षिक पाऊस सुमारे ३३०० मिलिमीटर आहे, हे लक्षात घेता अखेरच्या महिन्यात ही तूट भरून निघणे जवळजवळ अशक्य दिसत आहे.
माघारी जाणारा पाऊस सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये काहीसा दिलासा देईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. मात्र तसे न घडल्यास यंदा कोकणवासीयांनाही अभूतपूर्व पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल, अशी चिन्हे आहेत.