आतापर्यंत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आघाडी म्हणून सत्तेत असणा-या राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याने आम्ही स्वबळावरच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा परिषदेसमोरील विष्णूअण्णा भवनात बोलावण्यात आली होती. या बैठकीस वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, महापौर कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी, काँग्रेसचे आजीमाजी नगरसेवक उपस्थित होते. या वेळी बोलताना मदन पाटील यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संपर्क वाढविण्यावर भर द्यावा असे सांगितले.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मदन पाटील यांनी सांगितले, की लोकसभा, महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी धर्माला तिलांजली देत भूमिका पार पाडली. त्यांचे बोलणे एक आणि करणे दुसरेच ही प्रवृत्ती असल्यामुळे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत. आमचा पिंड दादांचा असल्यामुळे लोकहिताच्या कामावरच आम्ही मतदारांना सामोरे जाणार आहे.
गेल्या वेळी लोकविकासाची कामे करुनही मतदान झाले नाही. लोकांचा भाषणावर विश्वास आहे की, विकासावर याचा गेल्या पाच वर्षांत विचार केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर अघटित घटना घडल्यामुळे पराभव झाला. बदलत्या स्थितीत सांगलीकरांनी महापालिका दुस-याच्या ताब्यात देऊन बघितले. मात्र योजनांची पूर्ती होऊ शकली नाही. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. याची जाणीव लोकांना झाली आहे. शहराचा विकास करण्यासाठी पुन्हा मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादीची मदत मिळणार नाही, हे गृहीत धरून स्वबळावरच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. आघाडी धर्म म्हणून आम्हाला मते मिळाली तरी वावडे असणार नाही. मात्र याबाबत विश्वासार्हता कितपत अशी शंका वाटते.
या निवडणुकीत आपणाला विरोधक कोण असे विचारले असता पाटील यांनी सांगितले, की रोज एकाचे नाव पुढे येत आहे, त्यामुळे नेमका विरोधकच अस्पष्ट आहे. कार्यकर्त्यांच्या जोरावर पुन्हा एकदा मदानात उतरण्याची तयारी केली असून, काँग्रेसची उमेदवारी आपणालाच मिळेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.