गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये कोल्हापुरातील महाद्वार रोडवर ध्वनिप्रदूषणाची पातळी सर्वाधिक असल्याचे शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या तपासणीतून समोर आले आहे. व्यावसायिक क्षेत्रातील भाग असून त्यासाठीच्या मार्गदर्शक पातळीपेक्षाही पाऊण पटीने जास्त ध्वनिप्रदूषण झाल्याचे आढळून आले, ही चिंताजनक बाब असल्याचे अधिविभागाचे प्रमुख डॉ. पी.डी. राऊत यांनी सांगितले.
डॉ. राऊत म्हणाले, विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून दर वर्षी गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीमध्ये कोल्हापूर शहरात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची पातळी तपासतात. याच उपक्रमांतर्गत यंदाही गणेशोत्सवा दरम्यान विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचीनुसार ध्वनिप्रदूषणाचे मोजमाप केले. या मार्गदर्शक सूचीनुसार अभ्यास करताना कोल्हापुरातील रहिवासी क्षेत्र, शांतता क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि व्यापारी क्षेत्र अशा सर्व ठिकाणी मोजमाप करण्यात आले. ही मोजमापे ध्वनिमापक उपकरणाद्वारे  डेसिबल या एककात करण्यात आली. व्यावसायिक क्षेत्रात ध्वनिप्रदूषणाची पातळी मार्गदर्शक सूचीनुसार दिवसा ६५ डेसिबल आणि रात्री ५५ डेसिबल असावी लागते. ती महाद्वार रोडवर दिवसा ८० डेसिबल आणि रात्री ९८ डेसिबल इतकी मोठय़ा प्रमाणात ओलांडली गेली. सी.पी.आर. न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय या शांतता क्षेत्रांमध्येही ही पातळी मार्गदर्शक सूचीपेक्षाही अधिक आढळून आली.