अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष असल्याचा दावा करणारे नरेंद्रगिरी महाराज यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गाझियाबाद येथे मद्यविक्रेता व बांधकाम व्यावसायिकाला महामंडलेश्वर हा सन्मान दिल्याच्या मुद्दय़ावरून महंत ग्यानदास महाराज यांनी संबंधितांवर आगपाखड केली आहे. नरेंद्रगिरी महाराज आखाडा परिषदेचे अध्यक्ष नाहीत, बनवेगिरी करत संबंधितांचा कारभार सुरू असल्याचा आरोपही ग्यानदास महाराजांनी केला. द्वारका पीठाचे शंकराचार्य महाराजांनी साईंचा अपमान थांबवावा, अन्यथा आपण आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यात गाझियाबाद येथे एका मद्यविक्रेता व बांधकाम व्यावसायिकाला नरेंद्रगिरी महाराजांनी महामंडलेश्वर पदवीने सन्मानित केले. त्याचे पडसाद कुंभनगरीत उमटले. नरेंद्रगिरी महाराजांची ही बनवेगिरी आहे. त्यांच्यामार्फत ज्या आखाडा परिषदेचा संदर्भ दिला जातो, तीदेखील बनावट आहे. त्यामुळे अशा लायकी नसलेल्या व्यक्तींवर पदांची खैरात होत असल्याची तोफ त्यांनी डागली. पर्वणीकाळात पदव्यांचा बाजार मांडला गेला आहे. ज्यांना हिंदू धर्म माहीत नाही, संस्कृती माहीत नाही, अशा विदेशी लोकांनाही पदव्यांनी कशासाठी सन्मानित केले जात आहे, असा प्रश्न ग्यानदास महाराजांनी उपस्थित केला. द्वारकापीठाच्या शंकराचार्यानी साईबाबा आणि संस्थानच्या कारभारावर टीका केली होती. काहीएक कारण नसताना त्यांनी साईभक्तांच्या श्रद्धेला डिवचण्याचे काम केले. त्यांच्या टीकेनंतर साईभक्तांच्या संख्येत वाढ झाली हे त्यांनी अद्याप लक्षात घेतलेले नाही, असेही ग्यानदास यावेळी म्हणाले.