विरोधकांच्या मागणीनंतर अखेर कोपर्डी बलात्कार प्रकरणी चर्चेला मंगळवारी दुपारी विधान परिषदेत सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरुवातीपासून विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरले होते. दरम्यान, विरोधकांनी कोपर्डी प्रकरणाचा मुद्द्यावर सोमवारी स्थगन प्रस्ताव सादर केला होता.
या प्रकरणावर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर सवालाच्या फैरी झाडत त्यांना धारेवर धरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरचे पालकमंत्री राम शिंदेंबद्दल दाखवलेली तत्परता या घटनेबद्दल का दाखवली नाही, असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. तसेच मुंडे यांनी सरकारने सुरु केलेल्या ‘प्रतिसाद अॅप’ला महिलांचा प्रतिसाद नसल्याचे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिले. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने राबवलेला हा उपक्रम अपयशी ठरल्याचे सांगत त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासाळली असल्याचे म्हटले आहे. अहमदनगर जिल्ह्यामधील कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर दोन दिवस आरोपी मोकाट होते. या मोकाट आरोपींना लोकांनी पकडल्याचे सांगत मुख्यमंत्र्याच्या राज्यातील पोलीस दोन दिवस काय करत होते? असा संतप्त सवालही  धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.