भाजपाच्या राज्य अधिवेशनानिमित्त मुख्यमंत्र्यांसह निम्म्याहून अधिक मंत्रिमंडळ दाखल झाल्याने करवीर नगरीला तीन दिवस मिनी मंत्रालयाचे स्वरुप आले आहे. बहुतेक सर्व मंत्र्यांनी आपल्या विभागाच्या बैठका घेण्याचे सत्र सुरु केले असल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. तर, आपली कामे करुन घेण्यासाठी नागरिकांचीही धावपळ सुरु आहे. एकामागून एक बैठका पार पडत असल्या अन् आश्वासनांची खैरात होत असली तरी प्रत्यक्षात जटिल समस्या किती प्रमाणात मार्गस्थ झाल्या हा प्रश्न अनुत्तरित आहे.
अधिवेशन भरण्यापूर्वी टोलच्या प्रश्नामुळे भाजपाच्या गोटात चिंता निर्माण झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याप्रमाणे शहर बंद ठेवून व काळे झेंडे दाखवून फडणवीस यांचे स्वागत होणार का याची धास्ती निर्माण झाली होती. पण सहकार तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टोल आंदोलनाचे नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून देण्याचे आश्वासन दिल्याने शहर बंदचा मुद्दा मागे पडला.
भाजपाच्या अन्य मंत्र्यांनीही आपल्या विभागाच्या बठका घेण्याचे नियोजन केले आहे. मंत्री गिरीश बापट यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल चार बैठकांचा फडशा पाडला आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री या नात्याने ते दूध उत्पादक-विक्रेते, गूळ उत्पादकांशी तर ग्राहक संरक्षण मंत्री या नात्याने या विभागाची बैठक घेतली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशीही त्यांची चर्चा झाली. इतर अनेक मंत्र्यांनीही आपल्या खात्याच्या बैठका घेऊन त्याची माहिती माध्यमांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न चालविले होते.

हजारावर प्रतिनिधींना कोल्हापुरी चप्पल
हजारावर प्रतिनिधींना कोल्हापूरी चप्पल भेट देण्यात येणार आहे. जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पादत्राणांच्या भेटीतून भाजपाने चांगला पायंडा पाडल्याची प्रतिक्रिया चप्पल कारागिरांकडून उमटत आहे.  सुमारे दीड हजार रुपये किंमतीचे कोल्हापूरी चप्पलाचे एक हजार जोड बनविण्याचे काम स्थानिक काही कारागिरांकडे सोपविले असून त्यांची चप्पल बनविण्यासाठी धांदल उडाली आहे. भाजपाचे कोल्हापूरी चप्पल भेट देण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसच्या एका गोटातून तक्रारीचा सूर उमटला होता. सरकारच्या अप्रिय कामगिरीचा उल्लेख  करुन त्यांना कोल्हापूरी चप्पल भेट दिली जावी, अशी टीका करण्यात आली होती.

मंत्र्यांची परीक्षा
अधिवेशनच्या उद्घाटनासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येथे येणार आहेत. उद्घाटनाचे सत्र संपल्यानंतर शनिवारी रात्री ते राज्यातील मंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. यानिमित्त प्रत्येक मंत्र्याची कामगिरी ते आजमावून पाहणार आहेत. एका अर्थाने पक्षाध्यक्षांच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार असल्याने मंत्र्यांचाही या दिशेने सराव सुरु होता.

आपल्या चर्मकार समाजासाठी ही भूषणावह बाब  आहे. कोल्हापूरच्या चप्पलेने अगोदरच जगभरात नाव कमावले असताना जाहीर स्वरुपात होणार्या एखाद्या कार्यक्रमात चप्पल भेट देण्याचा चांगला पायंडा पाडला आहे. चर्मोद्योग महामंडळामध्ये तज्ञ अध्यक्षांची नियुक्ती करावी.
-भूपाल शेटे, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>