सत्तेत असूनही भाजपवर टीकेची झोड उठवून जेरीस आणणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी अनेकदा भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा केली आहे. शिवसेनेनं पाठिंबा काढून घेतल्यास सरकार पडेल, अशी चिंता भाजपला होती. ही युती टिकवून ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पण राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर राज्यातील बेरजेचं राजकारण बदललं आहे. भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना निवडणुकीत राज्यातील विधानसभेतील तब्बल २०८ आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळं पाठिंबा काढून घेण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेची भाजपला गरजच नाय! अशी चर्चा आता राजकीय जाणकारांमध्ये सुरू आहे. सरकार टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकवेळी ‘जुळवून’ घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतांचं गणित जुळवण्यात यशस्वी ठरले आहेत, असेही दिसून येते.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद विजयी झाले. त्यांना महाराष्ट्र विधानसभेतून २०८ मतं मिळाली. शिवसेनेनंही त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळं शिवसेनेची ६३ मते कोविंद यांना मिळाली. पण राज्यात त्यांना एकूण २०८ मतं मिळाली आहेत. या एकूण मतांमधून शिवसेनेची ६३ मतं वगळली तरी त्यांना १४५ मतं मिळाली आहेत. त्यामुळं या निवडणुकीत राज्यातील राजकीय गणितं बदललेली आहेत, हे स्पष्ट दिसून येतं. राज्यातील सत्तेचा विचार केल्यास विधानसभेच्या २८८ पैकी सरकार स्थापण्यासाठी १४५ मतं गरजेची असतात. शिवसेनेनं जरी सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर बहुमतासाठी लागणारा जादुई आकडा भाजपकडं आहे, असं गणित राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात आलं आहे. त्यामुळं राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपला शिवसेनेची गरजच नाय, हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं आहे, असं विश्लेषक म्हणत आहेत.

कोविंद यांना महाराष्ट्रातून भाजप, शिवसेना आणि छोटे पक्ष, अपक्षांच्या संख्याबळापेक्षा १२ मतं जास्त मिळाली. त्यामुळं या निवडणुकीत विरोधकांची मतं फुटली आहेत, हे स्पष्ट झालं आहे. राज्यात २८८ पैकी २८७ आमदारांनी मतदान केलं. त्यातील २०८ मतं कोविंद यांना, तर मीरा कुमार यांना ७७ आमदारांनी मतदान केलं. भाजप १२२, शिवसेना ६३, अपक्ष ७, बविआ २ आणि रासप १ अशा १९५ सदस्यांचा कोविंद यांना पाठिंबा होता. राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनीही कोविंद यांना मतदान केल्याचं जाहीर केलं होतं. ही १९६ मतं गृहीत धरली तर या निवडणुकीत भाजपला १२ अधिक मतं मिळाली आहेत. तर दोन मतं बाद झाली आहेत. ती कोणत्या पक्षांची याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेस ४२ आणि राष्ट्रवादीचे ४१ सदस्य आहेत. हा आकडा ८३ आहे. पण मीरा कुमार यांना ७७ मतंच मिळाली. त्यामुळं राष्ट्रवादी-काँग्रेसची सहा मतं फुटल्याचं आकडेवारीवरून दिसत असलं तरी त्यांची जास्त मतं फुटल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.