केंद्र सरकारपाठोपाठ आता राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धीत कर (व्हॅट) कमी केला असून यामुळे पेट्रोल प्रतिलिटर २ रुपये तर डिझेल प्रति लिटर १ रुपयांनी स्वस्त होणार आहे. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने देशभरात संतापाचा आगडोंब उसळला होता. केंद्र सरकारने हा आगडोंब शमविण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केला होता. राज्य सरकारनेही पेट्रोल- डिझेलवरील कर कमी करावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले होते.

गुजरातपाठोपाठ मंगळवारी राज्य सरकारनेही पेट्रोल- डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल- डिझेलचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे. आज (मंगळवारी) मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. पेट्रोल लिटरमागे २ तर डिझेल लिटरमागे १ रुपयांनी स्वस्त होणार आहे.

भारतात महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक व्हॅट आहे. सोमवारीच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पेट्रोल- डिझेल दरकपातीची घोषणा केली होती. मात्र अधिभार कमी करायचा की व्हॅट कमी करायचा बाबात निर्णय झाला नव्हता. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात पेट्रोलवर २५ टक्के तर डिझेलवर २१ टक्के व्हॅट आहे. तर इतर ठिकाणी पेट्रोलवर २६ टक्के आणि डिझेलवर २२ टक्के व्हॅट आहे.