मरगळलेल्या काँग्रेसला बळ देण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदी मराठवाडय़ातील नेत्याची तिसऱ्यांदा निवड झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काँग्रेसचा विचार भाषणातून नीटपणे मांडू शकेल आणि त्याची प्रतिमाही जनसामान्यांमध्ये ओळखीची असेल, असा नेता म्हणून अशोकरावांची झालेली निवड ते सार्थ ठरवतील, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. नांदेडसह मराठवाडय़ात त्यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत झाले.
‘आदर्श’ घोटाळा आणि ‘पेडन्यूज’मुळे चव्हाण चर्चेत होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी त्यांचे नाव आल्यानंतर ते जाहीर होण्यासाठी काँग्रेसने बराच वेळ घेतला. मात्र, संघटन करू शकेल आणि राज्यातील काँग्रेसची घडी नीट बसवू शकेल, असा नेता नसल्याने अशोकरावांकडेच ही जबाबदारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची जोरदार मागणी होती. औरंगाबाद महापालिका निवडणुकीची जबाबदारी यापूर्वी त्यांच्याकडेच सोपविण्यात आली होती. कोणत्याही जबाबदारीचे काम अन्य व्यक्तींवर सोपवावे, अशी मराठवाडय़ात स्थितीच नव्हती. त्यामुळे अशोकरावांचेच नेतृत्व जवळपास सर्वानी गृहीत धरले होते. अगदी सामाजिक काम करणाऱ्या संघटना आणि विचारवंतांनी अशोकराव हेच नेते असल्याचे अलिखित संदेश दिले होते. या पाश्र्वभूमीवर राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे येईल असे मानणाऱ्यांचा मोठा वर्ग होता. निवडणुकांमध्ये इतर मतदारसंघात लक्ष घालून कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व काही करणारा नेता अशी अशोकरावांची ओळख असल्याने कार्यकर्ते मरगळ झटकून कामाला लागतील, अशी प्रतिक्रिया आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.
औरंगाबाद येथे कार्यकर्त्यांची विशेष बैठकही सोमवारी घेण्यात आली. काँग्रेसचे सचिव बाला बच्चन यांची या वेळी उपस्थिती होती. कार्यकर्त्यांचे ऐकून घ्यायला हवे, हे पक्ष जाणून असल्याने चिंतन बैठका सुरू झाल्या आहेत. नव्या नियुक्तीमुळेही पक्षाला उभारी मिळेल, असे ते म्हणाले. यापूर्वी यशवंतराव चव्हाण यांनी वैजापूरचे विनायकराव पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. शिक्षकी व्यवसायातल्या या माणसाने पक्षाची मजबूत बांधणी केल्याची आठवण आजही सांगितली जाते. तसेच शिवाजीराव निलंगेकर पाटील यांनी ही जबाबदारी पेलली होती. तिसऱ्यांदा पक्ष संघटनेची धुरा मराठवाडय़ातील व्यक्तीकडे आली आहे.
या अनुषंगाने नांदेड येथे बोलताना ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले की, काँग्रेस पक्ष सध्या राजकीय संक्रमणावस्थेतून जात आहे. या पाश्र्वभूमीवर प्रदेश काँग्रेसची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कठीण काळात झालेली ही निवड योग्य, तसेच सार्थ आहे. काँग्रेसची वाटचाल सध्या प्रतिकू ल अवस्थेतून सुरू आहे. काही महिन्यांनी ग्रामपंचायतीच्या, तर आगामी दीड-दोन वर्षांनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या पाश्र्वभूमीवर लोकांचा विश्वास पुनस्र्थापित करण्यासाठी चव्हाण यांना खूप परिश्रम करावे लागतील. काँग्रेसच्या सर्व नेते, कार्यकर्त्यांनी चव्हाण यांना साथ देण्याची गरज आहे.
परभणीत जल्लोष
परभणी – अशोक चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल परभणीत फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. उड्डाणपुलावर युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतषबाजी केली. मनपा सदस्य आकाश लहाने, नागेश सोनपसारे, संजय लहाने, सतीश दामोधरे आदी कार्यकत्रे सहभागी झाले होते.
प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची
निवड योग्य आणि सार्थ- चाकूरकर
वार्ताहर, नांदेड
काँग्रेस पक्ष सध्या राजकीय संक्रमणावस्थेतून जात आहे. या पाश्र्वभूमीवर प्रदेश काँग्रेसची जबाबदारी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कठीण काळात प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवड योग्य तसेच सार्थ आहे, या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करताना पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी चव्हाण यांचे अभिनंदन केले.
चाकूरकर एका कार्यक्रमानिमित्त सोमवारी नांदेडमध्ये आले होते. महापौर अब्दुल सत्तार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, आमदार डी. पी. सावंत, उपमहापौर आनंद चव्हाण, आमदार वसंतराव चव्हाण, स्थायी समितीचे सभापती विनय पाटील गिरडे यांनी शासकीय विश्रामगृहावर चाकूरकर यांचे स्वागत केले. चाकूरकर म्हणाले, की काँग्रेसची वाटचाल सध्या प्रतिकू ल अवस्थेतून सुरू आहे. काही महिन्यांनी ग्रामपंचायतीच्या, तर आगामी दीड-दोन वर्षांनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या पाश्र्वभूमीवर लोकांचा विश्वास पुनस्र्थापित करण्यासाठी चव्हाण यांना खूप परिश्रम करावे लागतील. काँग्रेसच्या सर्व नेते, कार्यकर्त्यांनी चव्हाण यांना साथ देण्याची गरज आहे.
आमदार बस्वराज पाटील त्यांच्यासमवेत होते. मी राजकारणातून अजून निवृत्त झालो नाही. त्यामुळे पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडण्यास आपण सक्षम आहोत. नवीन पिढीलाही संधी मिळणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.