23 October 2017

News Flash

तुम्ही माझी हकालपट्टी काय करणार, मीच काँग्रेस सोडतो: नारायण राणे

दसऱ्यानंतरच पुढील निर्णय घेणार

मुंबई | Updated: September 21, 2017 5:50 PM

Narayan rane : दिल्लीत आज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे. या बैठकीनंतर नारायण राणे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

तुम्ही माझी हकालपट्टी काय करणार, मीच काँग्रेस सोडतो असे सांगत नारायण राणे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. माझी ताकद काय आहे हे आता दाखवून देणार असून उद्यापासून राज्याचा दौरा करणार आहे. नवरात्रीनंतरच पुढील निर्णय घेऊ असे राणेंनी म्हटले आहे. शिवसेनेचे २७ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. घटस्थापनेच्या मुहूर्तावर भावी वाटचालीची घोषणा करु असे राणेंनी जाहीर केले होते. त्यामुळे नारायण राणे आज (गुरुवारी) काय बोलणार याची उत्सुकता होती. राणे यांनी काँग्रेसला रामराम केला असला तरी त्यांनी भविष्यातील वाटचालीविषयी सस्पेन्स कायम ठेवला आहे. मी आणि निलेश राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून आमचा काँग्रेसशी संबंध नाही असे त्यांनी जाहीर केले. दसऱ्यानंतरच पुढील निर्णय घेणार असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस आणि शिवसेनेतील अनेकांचा मला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेनेचे २७ आमदार राजीनाम्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. सभागृहात काँग्रेसने विधायक काम केले नाही. अशोक चव्हाण यांनी फक्त मला अडचणीत आणण्याचे काम केले नाही असे राणेंनी सांगितले. काँग्रेसचे महाराष्ट्रातील दुकान बंद होणार असून महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची पात्रता अशोक चव्हाणांमध्ये नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

शिवसेनेच्या चक्रव्यूहातून मी बाहेर पडलो होतो. ती विद्या मी आत्मसात केली असून राणेंचा अभिमन्यू होणार का असा प्रश्नच निर्माण होत नाही असेही त्यांनी सांगितले. माझे यश उद्धव ठाकरेंना पाहता आले नाही, त्यामुळेच माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले. म्हणून मी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. मी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन चूक केली असे वाटत नाही. मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप होत नसल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करायचं असून मला करुन दाखवायचंय अशा घोषणा द्यायच्या नाही असा टोला त्यांनी सेनेला लगावला. शिवसेना फक्त भाजपपुढे नाक घासत असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

First Published on September 21, 2017 3:26 pm

Web Title: maharashtra congress leader narayan rane press conference updates bjp ashok chavhan nitesh rane new political party