चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा छळ-जाच करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अलिबाग तालुक्यातील बहिरोळे-टाकादेवी येथील पती संदीप प्रभाकर भोईर याला अलिबाग येथील सत्र न्यायालयाने चार वष्रे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे मृत विवाहिता ही वकील होती, तर संदीप हा व्यवसायाने सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) आहे.

याप्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, २३ मार्च २००८ रोजी व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या संदीप भोईर याचे लग्न वकील असलेल्या रुपाली हिच्यासोबत झाले होते. लग्नानंतर रुपालीला अनेक वाईट अनुभव आले. रुपालीने याबाबत आपल्या आई-वडिलांना सांगितले होते. नवरा संदीप हा चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचे तिने सांगितल्यानंतर रुपालीच्या वडिलांनी दोघांचीही समजूत काढली होती.

४ जानेवारी २०१२ रोजी घरातील लँडलाइनवर रुपालीने फोन केला, तो फोन तिची आई मंदा हिने उचलला. तेव्हा रुपाली फोनवर रडत होती. त्यामुळे तिच्या आईने तो वडिलांना दिला. रुपालीने वडिलांना ‘तुम्ही माझ्या घरी लवकर या, माझा नवरा मला जास्त त्रास देत आहे’ असे सांगितले. म्हणून ते आपला भाऊ हिराचंद्र पाटील यांना सोबत घेऊन रुपाली राहात असलेल्या टाकादेवी येथील घरी गेले. तेव्हा रुपाली आणि जावई संदीप घरीच होते.

रुपालीला काय झाले, याबाबत त्यांनी विचारले असता रुपालीने नवरा संदीपसमोर सांगितले की, माझा नवरा माझ्या मोबाइलवर कोणाचा तरी फोन आला, यावरून वाईट संशय घेऊन मला रात्रीपासून त्रास देत आहे. तेव्हा तिच्या वडिलांनी व त्यांच्या भावाने

जावयाची समजूत घातली. त्यावेळी संदीपने यापुढे असे घडणार नाही, माझी चूक झाली. असे सांगत त्यांची माफी मागितली. त्यानंतर तीनच दिवसांनी ७ जानेवारी रोजी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान रुपालीच्या माहेरी लँडलाइनवर फोन आला, तो तिच्या आईने उचलला. रुपालीच्या सासूने त्यांना कळवले की, रुपालीची तब्येत गंभीर आहे. त्यामुळे रुपालीचे वडील, त्यांचा मोठा भाऊ, पुतण्या हे रुपालीच्या सासरी पोहोचले.

त्यावेळी तिच्या सासूने संदीप रुपालीला घेऊन अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात गेला असल्याचे सांगितले. म्हणून ते सगळे रुग्णालयात पोहोचले. तेथे डॉक्टरांनी रुपालीला तपासून  मृत घोषित केले. त्यावेळी रुपालीच्या तोंडातून फेस येत होता व तिच्या तोंडातून कीटकनाशक फोरेटसारख्या विषारी औषधाचा वास येत होता.

त्यामुळे रुपालीचे वडील शशिकांत दगडू पाटील यांनी ७ जानेवारी २०१२ रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रुपालीचा संदीप शारीरिक व मानसिक छळ करीत होता. त्यामुळेच तिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची नोंद

अलिबाग पोलिसात करण्यात आली. तसेच याप्रकरणी संदीपविरोधात भादंवि कलम ४९८ अ, ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. व त्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक पी.बी. मुठे यांनी तपास पूर्ण करून संदीप भोईरविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यामध्ये अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. श्रीमती एन.जी. तुळपुळे यांनी एकूण नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. या खटल्यामधील फिर्यादी रुपालीचे वडील शशिकांत पाटील व आई मंदा, वैद्यकीय अधिकारी धुमाळ यांची साक्ष महत्त्वपूर्ण

ठरली. सुनावणीअंती संदीप भोईर याने पत्नी रुपालीला छळ, जाच करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा निष्कर्ष काढून अलिबाग येथील सत्र न्यायाधीश श्रीमती. ए. डी. सावंत यांनी संदीप भोईरला भादंवि कलम ३०६ प्रमाणे चार वष्रे सक्त कारावासाची शिक्षा व ३ हजार रुपये दंड व कलम ४९८-अ प्रमाणे एक वर्ष सक्त कारावासाची शिक्षा व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.