३५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत; गुन्हे दाखल

मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडिवऱ्हे परिसरात चालकाला मारहाण करत विदेशी मद्याच्या ६०० बॉक्ससह आयशर टेम्पो पळवून नेणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा छडा लावण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले.

या प्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

५ मार्च रोजी रात्री वाडिवऱ्हे परिसरातील रायगडनगर शिवारात ही घटना घडली होती. दिंडोरीच्या मॅकडॉवेल कंपनीतून विदेशी मद्य घेऊन टेम्पो मुंबईला निघाला होता. काळ्या रंगाच्या मोटारीतून आलेल्या टोळीने महामार्गावर आपली गाडी आडवी लावून टेम्पो अडविला. चालकाला मारहाण करत त्याच्या ताब्यातील भ्रमणध्वनी, विदेशी मद्याने भरलेला टेम्पो व रोख रक्कम असा एकूण २९ लाख ४४ हजार रुपयांचा माल टोळीने लंपास केला. चालकाला आपल्या गाडीत टाकून त्याला सिन्नर ते घोटी रस्त्यावरील जंगलात सोडून दिले. या प्रकरणी वाडिवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला होता. खबऱ्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. या प्रकरणी नियामत खान अजमत खान (२८, रा. पखालरोड), अझरुद्दीन  महंमद शेख (२६, रा. नानावली, कठडा), आनंद प्रभाकर कोकाटे (३१, रा. आनंदवल्ली), राहुल संतोषलाल चावला (२८, आनंदनगर, नाशिकरोड), दिलीप रामचंद्र लालचंदानी (५१, उपनगर) यांना अटक करण्यात आली. संशयितांकडून आयशर टेम्पो, विदेशी मद्याचे ५८९ बॉक्स असा एकूण ३५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयितांमधील अझरुद्दीन शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी पुणे ग्रामीण व वणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.