सोलापूर महापालिकेत १०२ पैकी ४९ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी आणखी तीन जागांची गरज आहे. शिवसेनेने २१ जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे शिवसेनेला सोबत घेऊन भाजप महापालिकेत सत्ता स्थापन करणार काय, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे पालकमंत्री विजय देशमुख यांची शिवसेनेची साथ घेण्याची मानसिकता दिसत नाही, असे भाजपच्या गोटातून बोलले जात आहे.

महापालिकेत काँग्रेसचे पानिपत झाल्यानंतर भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली चालविल्या आहेत. परंतु शिवसेनेला सत्तेत भागीदार बनविण्यावरून भाजपमध्ये मतभिन्नता निर्माण झाली आहे.

शहरात शिवसेनेवरील पकड जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी मजबूत केली आहे. मावळत्या सभागृहात शिवसेनेचे ८ नगरसेवक होते. परंतु महेश कोठे यांनी २१ जागा जिंकून प्रभाव सिध्द केला आहे.‘कोठे बोले आणि शिवसेना हाले’ अशी स्थिती आहे. त्यामुळेच भाजपने शिवसेनेबरोबर युती करायची की बसपाच्या चार नगरसेवकांचे पाठबळ घ्यायचे, याचा विचार चालविला आहे.

महे कोठे यांनी ताब्यात घेतलेल्या शिवसेनेला पालिकेच्या सत्तेत सहभागी करून घेतले तर त्यात कोठे यांची ताकद आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालकमंत्री विजय देशमुख यांची दुखरी बाजू अशी की सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात महेश कोठे यांचा प्रभाव आहे.

शिवसेनेचे निवडून आलेले २१ पैकी निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे १२ नगरसेवक शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील आहेत. कोठे हे महत्त्वाकांक्षी असून त्यांनाही आमदारकीचे स्पप्न पडते. यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात विजय देशमुख यांच्या विरोधात लढत दिली होती. कोठे हे आपले स्पर्धक असल्याची देशमुख यांची पक्की समजूत आहे. तसेच कोठे यांनी यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना महापालिकेचे कारभारी म्हणून काम पाहिले असता त्यांच्या वादग्रस्त कारभाराची शैली देशमुख यांना ठाऊक आहे.

त्यामुळेच त्यांची शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करायची नाही, अशी मानसिकता असल्याचे बोलले जाते.

निकालानंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी भाजपच्या गोटात शांतता दिसून आली, तर शिवसेनेला भाजपकडून बोलावण्याची प्रतीक्षा आहे. शिवसेनेला वगळून बसपाच्या चार नगरसेवकांचे समर्थन घेऊन सत्ता स्थापन करणे कितपत योग्य ठरेल, याबाबतची चाचपणी भाजपच्या गोटात सुरू असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी सर्व पर्यायांचा विचार करून निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले.