जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची झालेल्या दारुण पराभवाचे पडसाद उमटत असून शनिवारी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी राजीनामा दिला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव िशदे यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा फटका काँग्रेसला बसला असल्याचे म्हणत श्री. पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना पाठविला आहे. प्रामाणिक कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी आणि व्यक्तिकेंद्रित राजकारण यामुळेच काँग्रेसला जिल्हा परिषद निवडणुकीत अपयश आले असून नजीकच्या काळात यामध्ये सुधारणा होण्याची सुतराम शक्यता दिसत नसल्याचे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार पाटील यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला आहे. खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तिन्ही गटात आणि पंचायत समितीच्या ५ गणामध्ये राष्ट्रवादीशी आघाडी करूनही शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून व्यक्तिकेंद्रित राजकारण केले जात असून गेल्या वर्षभरात यामध्ये अपेक्षित सुधारणा होऊ शकल्या नाहीत. यामुळे सामान्य माणूस काँग्रेसपासून बाजूला जात आहे. याचे परिणाम म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पक्षाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली असून याची जबाबदारी स्वीकारून आपण प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे श्री. पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. याचबरोबर विटा शहर काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता चोथे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, बागणी गटातून वैभव िशदे यांच्या पराभवामुळे राष्ट्रवादीतही गदारोळ माजला असून पराभवाची चिकित्सा करण्यासाठी झालेल्या बठकीमध्ये आ. जयंत पाटील यांचे म्हणणेही ऐकण्यास कोणी कार्यकर्ता राजी नव्हता. बंडखोर उमेदवार संभाजी कचरे यांचा झालेला विजय राष्ट्रवादीच्या िशदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असून बंडखोरांना मदत करणाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तर जिल्हाध्यक्ष विलासराव िशदे यांनी राजीनाम्याबरोबरच पक्षत्यागाची तयारी असल्याचेही या वेळी जाहीर केले.

बंडखोरी रोखण्यास आपण प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सांगत आ. पाटील यांनी संतप्त कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्त्यांनी खुलासा ऐकण्यापेक्षा बठक सोडणेच पसंत केले.