कुटुंबाला वर्षभर पुरेल इतकेच धान्य पिकविणार

कर्जमाफी, उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव मिळावा आणि जिल्हा बँकेत जमा झालेल्या खरीप हंगामातील पीकविम्याची रक्कम तत्काळ वाटप करावी, या मागणीसाठी कळंब तालुक्यातील वाणेवाडी येथील शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसा ठराव ग्रामसभेत झाला असून खरिपात हायब्रीड आणि रब्बी हंगामात कुटुंबाला पुरेल इतकेच ज्वारी, गव्हाचे उत्पादन घेणे, असे या संपाचे स्वरूप असणार आहे. वाणेवाडीनंतर जिल्ह्णाातील अन्य गावातील शेतकरीही संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.

जिल्ह्णात सलग तीन वष्रे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्या वेळी शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरीही आíथक संकटात सापडला. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झालेला असताना सुद्धा मागील वर्षी चांगला पाऊस पडेल, या आशेवर कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांनी उसनवारी करून ५७ हजार शेतकऱ्यांनी ६४ हजार हेक्टरवर खरीप पेरणी केली होती. परंतु पुन्हा एकदा निसर्गाने दगा दिला आणि पाऊस न झाल्यामुळे शेतातील पिकेही पाण्याविना करपून गेली होती. हीच परिस्थिती रब्बी हंगामात देखील कायम राहिली. अशा नसíगक संकटांना तोंड देत शेतकऱ्यांनी कसेबसे उत्पन्न काढले. मात्र, शेतमालाला भावच नसल्याने आजपर्यंत शेतकरी अस्मानी संकटांबरोबरच सुलतानी संकटाचा सामना करत चालला होता. त्यामुळे शेतीचे अर्थचक्र पूर्णत कोलमडले आहे. अशा परिस्थितीत शासनही शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन धोरण राबवत असल्याने एका मागून एक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनीच हे चक्र सोडविण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबिल्याचे दिसत आहे.

कळंब तालुक्यातील वाणेवाडी या छोटय़ाशा गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या सगळ्या गोष्टींचा निषेध करत १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचे कर्ज शासन जोपर्यंत माफ करत नाही, तोपर्यंत हे शेतकरी संपावर असणार आहेत. यामध्ये हे शेतकरी केवळ स्वतपुरतेच पीक घेणार असल्याने शेतकऱ्यांच्या या निर्णयाने मोठी खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येत वाणेवाडी ग्रामपंचायतीला तसा ठरावही घेतला आहे. तो ठराव बहुमताने मंजूर करून घेतला आहे. आता या ठरावाची अंमलबजावणी हे शेतकरी १ तारखेपासून कसे करतात, याकडेच आता सर्वाचे लक्ष लागले आहे.