राज्य सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात दुजाभाव करत असल्याची टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली. ते शनिवारी औरंगाबाद येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते. काही दिवसांपूर्वी सरकारने मराठा समजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा आघाडी सरकारचा निर्णय कायम ठेवला, परंतु मुस्लिम समाजाच्या ५ टक्के आरक्षणाबद्दल कोणतीची भूमिका घेतली नाही. अखेर या अध्यादेशाची मुदत संपल्यामुळे मुस्लिमांसाठीचे आरक्षण आपोआप रद्द ठरले होते. मात्र, हे आरक्षण मुस्लिम समाजाचा हक्क असल्याचा दावा ओवेसी यांनी केला.
काही दिवसांपूर्वी विरोधकांनी विधानसभेत मुस्लिम आरक्षणावरुन युती सरकारला टीकेचे लक्ष्य केले होते. त्यापाठोपाठ आता एमआयएमनेही या प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुस्लिम आरक्षणावरुन महाराष्ट्र सरकार दुजाभाव करत आहे. मुस्लिम आरक्षण हा हक्क आहे. जर तो भाजपशासित कर्नाटकात आहे तर महाराष्ट्रात का नाही असा सवाल ओवेसींनी यावेळी राज्य सरकारला केला.
मुस्लिम आरक्षणासंदर्भातील अध्यादेश मंजूर करण्यासाठी आपण अधिवेशन बोलवण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.