राज्यात मराठय़ांविरूध्दचे वातावरण असताना आणि सत्तेसाठी काही मराठे नेते स्वाभिमान गहाण टाकत असताना मराठा समाजास आरक्षण कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित करत आ. नितेश राणे यांनी मराठा आरक्षण करण्याची सरकारचीच इच्छाशक्ती नाही, असा आरोप केला.
रविवारी येथील रावसाहेब थोरात सभागृहात मराठा एकीकरण समितीच्या वतीने ‘मराठा आरक्षण एल्गार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राणे यांनी मराठा आरक्षणाची गरज आणि आरक्षणासाठी येणारे अडथळे मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यापासून विनायक मेटे यांच्यापर्यंत अनेकांना राणे यांनी टिकेचे लक्ष्य केले. अलिकडेपर्यंत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे विनायक मेटे यांना सत्तेमध्ये पद मिळण्याचे चिन्ह दिसताच चुप्पी साधली आहे. चुकीचा इतिहास मांडणाऱ्यांचा महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरविणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून मराठा आरक्षणाची आशा कशी धरता येईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी माजी आमदार माणिक कोकाटे यांनी मराठा आरक्षणासाठी इतर समाजातील नेत्यांवर टीका करण्यापेक्षा आपल्या समाजातील नेते गप्प का, हे तपासण्याचा सल्ला दिला. मराठा समाजाने आरक्षणासाठी एकत्र येत दबावगट निर्माण करण्याची गरज आहे. तसेच आरक्षणाव्यतिरिक्त इतर मुद्यांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे मत मांडले. प्रास्तविक स्वाभिमान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. संदीप कोतवाल यांनी केले.

मेळाव्यात मराठवाडय़ातील एका पदाधिकाऱ्याने सर्वच पक्षांसह राज ठाकरे, छगन भुजबळ यांच्यावर असभ्य भाषेत टीकास्त्र सुरू केल्यावर उपस्थितांपैकी एका ज्येष्ठ व्यक्तीने त्यास विरोध करत व्यक्तीगत टीका टाळण्याचे आवाहन केले. परंतु, त्यांच्या आवाहनाची व्यासपीठावर उपस्थित आ. नितेश राणे, माजी आमदार माणिक कोकाटे, माजी खासदार माधवराव पाटील यापैकी कोणीच दखल घेतली नाही. उलट, राणे यांनी आपल्या भाषणात संबंधितास ‘गप्प बसा’ असे दरडावले.