महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटत नाही तोच राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकाम घोटाळ्याप्रकरणी भुजबळ यांची चौकशी करण्यास गुरूवारी राज्याच्या गृह विभागाने परवानगी दिली. त्यामुळे आता लाचलुचपत विभागाला छगन भुजबळ यांची चौकशी करण्याचे अधिकार मिळाले आहेत.
नियंत्रक व महालेखा परीक्षकांच्या (कॅग) अहवालात या सदनाच्या बांधकामाच्या कंत्राटात राज्य शासनाचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आमदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील याप्रकरणाच्या चौकशीसाठी लोकलेखा समितीनेही महाराष्ट्र सदनाची पाहणी केली होती.
मुंबईतील हायमाऊंट सरकारी विश्रामगृह आणि अंधेरीतील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बांधकामांशी सांगड घालून दिल्लीतील या महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करण्याच्या मोबदल्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने लोखंडवालाजवळ अंधेरी लिंक रस्त्यावर ४ लाख ५० हजार चौरसफूटांच्या चटईक्षेत्रासह हजारो कोटींचा भूखंड दिल्यामुळे विकासक चमणकर यांनी जेवढे बांधकाम केले त्याच्या कितीतरी पटींनी नफा कमावला असून त्यातून कोटय़वधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आले होते.