अवकाळी पावसाने झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, शेतकऱ्यांना कर्ज माफी करावी, अवाजवी वीज देयक बंद करावे, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून सात-बारा द्यावा अशा विविध मागण्यांसाठी शनिवारी किसान सभेच्यावतीने हरसूल येथे मोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी व इतर विभागाचे अधिकारी मोर्चाला सामोरे न गेल्याने मोर्चेकऱ्यांनी हरसूल-ठाणापाडा रस्त्यावर ठाण मांडून घोषणाबाजी केली.
विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभेने हरसूल येथे मोर्चाचे आयोजन केले होते. किसान सभेचे राज्य प्रतिनिधी इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. तालुक्यातील मुख्य रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, प्रत्येक कुटुंबाला रेशन कार्ड द्यावे आदी मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या. मोर्चाला महावितरण, कृषी, आदिवासी विकास विभाग, आरोग्य या विभागाचे अधिकारी सामोरे न गेल्याने मोर्चेकऱ्यांनी अचानक हरसूल-ठाणापाडा रस्त्यावर ठाण मांडून धरणे आंदोलन सुरू केले. यामुळे महसूल व पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली. मोर्चेकऱ्यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांच्या नावाने घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. समजूत काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर मोर्चेकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. बुधवारी उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर आपले प्रश्न मांडण्याची संधी दिली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.