लाच स्वीकारल्याबद्दल गुन्हा दाखल झालेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांनी अटक टाळण्यासाठी रुग्णालयाचा रस्ता पकडला आहे. मात्र त्यांची रुग्णालयातून सुटका होताच त्यांना अटक करण्यात येईल, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उदय आफळे यांनी सांगितले.
जमिनीवरील महापालिकेचे आरक्षण उठविण्यासाठी शुक्रवारी रात्री महापौर माळवी यांच्या सूचनेनुसार त्यांचा खासगी स्वीय सहायक मामेभाऊ अश्विन गडकरी याने १६ हजार रुपयांची लाच महापालिकेत स्वीकारली. याबद्दल त्यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक गडकरी याच्याविरुद्ध काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी गडकरी याला अटक करण्यात आली. मात्र महिलांना रात्री अटक करता येत नसल्याच्या कारणावरून माळवी यांना घरी जाण्यास सशर्त परवानगी देण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर रात्री महापौर माळवी या निवासस्थानी परतल्या. तथापि नंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र दवाखान्यातून सोडल्यानंतर लगेचच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.