माजी नगराध्यक्ष आणि येथील विद्यमान नगरसेवक पंकज पारख यांच्या बहुचर्चित सोनेरी शर्टची दखल आता ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ ने घेतली आहे. यासंदर्भातील माहिती मिळताच सोनेरी शर्ट परिधान करून पारख यांनी मंगळवारी मुंबई येथे सिध्दीविनायकचे दर्शन घेतले. या शर्टसाठी तब्बल चार किलो सोने वापरण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी पारख यांनी हा अनोखा शर्ट परिधान करून आपला वाढदिवस साजरा केला होता. तेव्हापासून जिल्ह्य़ात नव्हे, तर राज्यात त्यांचा शर्ट एक आकर्षण ठरले आहे. पारख हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. काही तरी वेगळे करायचे म्हणून त्यांनी लग्नाच्या वाढदिवशी म्हणजे १० जून २०१४ रोजी सोन्याचा शर्ट शिवण्याचे ठरविले. पारख यांनी शहरातील एका ज्वेलर्सशी संपर्क साधून तसा शर्ट तयार करण्याविषयी मागणी नोंदवली. २८ दिवसानंतर पारख यांचा सोन्याचा शर्ट तयार झाला. यासाठी १९ कारागिरांनी परिश्रम घेतले. वाढदिवशी गळ्यात सोन्याचा गोफ, अंगात सोन्याचा शर्ट, मनगटी सोन्याचे ब्रेसलेट, बोटात रत्नजडीत अंगठय़ा असा पारख यांचा थाट राज्यात चर्चेचा विषय झाला होता. काही जणांनी श्रीमंतीच्या या प्रदर्शनावर टीकाही केली होती. परंतु, हौसेला मोल नसते हेच खरे.