सोलापूरच्या जुनी मिल आवारातील भूखंड हस्तांतरण बेकायदा असल्याचा आरोप मंगळवारी आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्या प्रिती मेनन-शर्मा यांनी केला. स्थानिक शिवसेना नेते महेश कोठे आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांच्या नावे ही बेकायदा जमीन खरेदी झाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोटही मेनन यांनी केला. जुनी मिल आवारातील सुमारे ३६ एकर जागेवर प्लॉटस पाडून झालेल्या फसवणुकीप्रकरणी जुनी मिल बेकार कामगार व वारसदार संघर्ष समितीचे नेते तथा उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्वर्यू कुमार करजगी हे गेल्या तीन महिन्यांपासून कारागृहात आहेत. या ठिकाणी तब्बल दोन कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.  सध्या आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. ‘आप’ सुरूवातीपासून या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.

या पार्श्वभूमीवर ‘आप’च्या नेत्या प्रिती मेनन यांनी आज पत्रकार परिषदेत सहकारमंत्री सुभाष देशमुख व शिवसेनेचे स्थानिक नेते महेश कोठे यांच्यावर थेट आरोप केले. जुनी मिल कंपाउंड येथील कुमार करजगी यांच्या अधिपत्याखालील ट्रस्टच्या जागेवर काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचे वडील संभाजीराव शिंदे यांच्या स्मरणार्थ शाळा व महाविद्यालयाची बेकायदेशीर इमारत उभारण्यात आली आहे. महेश कोठे यांचे दिवंगत वडील व काँग्रेसचे तत्कालीन नेते विष्णुपंत कोठे यांनी ही संस्था स्थापन केली होती. त्यांच्यानंतर महेश कोठे हे या शिक्षण संस्थेची धुरा सांभाळत आहेत. सुमारे ८५ लाख रूपये किंमतीचा भूखंड कुमार करजगी यांनी विष्णुपंत कोठे यांना जवळपास मोफत म्हणजे केवळ अडीच लाख रूपयांत विकला होता. हा व्यवहार बेकायदा असून यामागे केवळ कुमार करजगी यांना राजकीय संरक्षण मिळवून देणे हाच हेतू होता, असा आक्षेप पोलीस यंत्रणेकडून नोंदविण्यात आल्याचे मेनन यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देखमुख यांनीही बेकायदा अडीच एकराचा प्लॉट खरेदी केला असल्याचा आरोप प्रिती शर्मा मेनन यांनी केला. आपण या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार असल्याच प्रिती मेनन यांनी सांगितले.