रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला २१ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत मात्र पक्षाला जेमतेम १२ जागांपर्यंत मजल मारता आली आहे. पक्षाची ताकद असणारा रोहा आणि माणगावमध्ये राष्ट्रवादीची पिछेहाट झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या जिल्ह्य़ातच धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीला कर्जतमधील दोन, खालापूर (३), रोहा, तळे, म्हसळा प्रत्येकी दोन २, तर श्रीवर्धनमधील एका जागेचा समावेश आहे. पंचायत समिती निवडणुकीत पक्षाची वाताहात झाल्याचे दिसून आले आहे. तळा, रोहा आणि म्हसळा या तीनच पंचायत समित्या राखण्यात पक्षाला यश आले आहे.

राष्ट्रवादी जिल्हा परिषदे आधी नगरपालिका निवडणुकीतही पक्षाला मोठा फटका बसला होता. मुरुड आणि माथेरान येथील सत्ता राष्ट्रवादीला गमवावी लागली होती. प्रस्थापितांना उमेदवारी नाकारल्याने पक्षांतर्गत बंडखोरी उफाळून आली होती. याची मोठी किंमत राष्ट्रवादीला मोजावी लागली होती. मागील विधानसभा निवडणुकीत सातपकी पाच जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.

त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या रायगड जिल्’ाात राष्ट्रवादीची सातत्याने पिछेहाट सुरू असल्याचे दिसून येत आहे. या पराभवाचे राष्ट्रवादीने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पक्षांतर्गत एकाधिकारशाही आणि कौटुंबिक महत्त्वाकांक्षा पक्षास मारक ठरत असल्याचे दिसून येत आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्य़ात मुरुड, रोहा आणि खोपोली येथे बंडखोरी झाली.

आदिती तटकरे यांना जिल्हा परिषदेत संधी मिळावी यासाठी रोहा तालुक्यातील मधुकर पाटील आणि नंदू म्हात्रे या दोन नेत्यांना डावलले गेले. खारगाव आणि नागोठणे मतदारसंघ पक्षाने गमावले. माणगावमध्ये तर पक्ष भुईसपाट झाला. श्रीवर्धनमध्येही शिवसेनेने शिरकाव केला. कर्जत खालापूरमध्ये शेकापशी आघाडी केल्याने पक्षाच्या पाच जागा निवडून आल्या. पण स्वबळावर निवडणूक लढवली असती तर या जागाही निवडून येणे कठीण होते.

पहिल्या क्रमांकावरून पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. ही परिस्थिती का निर्माण झाली याची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. पक्षाची नव्याने मोच्रेबांधणी करण्याची गरज आहे.

प्रमुख नेते पक्षाबाहेर

सुनील तटकरे यांची पक्षांतर्गत एकाधिकारशाही आणि कौटुंबिक महत्त्वाकांक्षा पक्षास मारक ठरत असल्याचे दिसून येत आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्य़ात मुरुड, रोहा आणि खोपोली येथे बंडखोरी झाली. जिल्हा परिषदेतील महेंद्र दळवी, राजीव साबळे, शाम भोकरे यांच्या सारखे नेते पक्षाला सोडून गेले. या सर्वानी पक्ष सोडताना  तटकरे यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले.