गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र हा रक्तदानाच्या क्षेत्रात देशात अग्रेसर राहिला असून यंदाच्या वर्षी तब्बल १६ लाख १७ हजार रक्ताच्या पिशव्या गोळा करून देशात नवा उच्चांक निर्माण केला. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्राने जमा केलेल्या एकूण रक्ताच्या पिशव्यांमध्ये तब्बल ९७ टक्के  रक्तदान हे ऐच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून गोळा करण्यात आले असून हाही एक राष्ट्रीय विक्रम ठरला आहे.

गेल्या दशकात पश्चिम बंगाल हे रक्तदानाच्या क्षेत्रात अग्रसेर होते. तथापि महाराष्ट्रात १९९७ साली राज्य रक्तसंक्रमण परिषदेची (एसबीटीसी) स्थापना केल्यापासून राज्यातील ऐच्छिक रक्तदानात पद्धतशीरपणे वाढ होऊ लागली. राजकीय व्यक्तींनी आपले वाढदिवस रक्तदान करून साजरे करावे, महिलांमधील रक्तदानाबाबत जागृती, रेल्वे स्थानकावर रक्तदान शिबीरे, बुवा-बाबा-महाराजांच्या माध्यमातून रक्तदान शिबीरे, राजकीय पक्षांना रक्तदान शिबीरासाठी प्रवृत्त करणे असे अनेक उपक्रम राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून दोन दशके राबविण्यात आले. तसेच जास्तीत जास्तवेळा रक्तदान करणाऱ्या दात्यांचा आणि शिबीर आयोजकांचा सत्कार करण्यामुळे ऐच्छिक रक्तदानात मोठय़ा प्रमाणात वाढ होऊ लागली. यातून गेल्या तीन वर्षांमध्ये अनुक्रमे महाराष्ट्रात १५ लाख ६२ हजार, १५ लाख ६६ हजार आणि यंदाच्या वर्षी १६ लाख १७ हजार रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात यश आले.

वर्षभरात २६ हजार शिबिरे

महाराष्ट्रात ३२१ रक्तपेढय़ा असून गेल्या वर्षभरात तब्बल २६,००० रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले. देशाचा विचार केल्यास देशात एकूण २६९० रक्तपेढय़ा असून देशभरात गेल्या वर्षभरात ६५,००० रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आली होती. यात महाराष्ट्राचा वाटा २६ हजार रक्तदान शिबीरांचा असून देशाच्या राजधानीत हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आली आहे.

जागतिक आयोग्य संघटना व राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या निकषांनुसार राज्याच्या लोकसंख्येच्या एक टक्का रक्त जमा होणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या सुमारे बावीस कोटी एवढी असून तेथे गेल्या वर्षभरात साडेनऊ लाख रक्ताच्या पिशव्या जमा होऊ शकल्या तर बिहारमध्ये अवघ्या दीड लाख रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या. यातही ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण कमी असून बदली रक्तदानाद्वारेच प्रामुख्याने बहुतेक राज्यात रक्त गोळा केले जाते. महाराष्ट्राने ऐच्छिक रक्तदानात रक्तक्रांती घडवून आणली असून देशभरात महाराष्ट्र पॅटर्न राबविण्याचे आदेश राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने दिले आहेत. राज्यातील रक्तदानाच्या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राला तीनवेळा पुरस्कारही मिळाले आहेत.