राज्यात फळबाग विकासाला चालना देण्यासाठी अमिताभ बच्चन यांची ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली असली, तरी फळे आणि भाजीपाला शीत साठवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र पिछाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे.
 पीक हाती आल्यानंतर शीतगृहांच्या कमतरतेमुळे २० ते ३० टक्के शेतमालाची नासाडी होते. फळ उत्पादनात अव्वल स्थान मिळवूनही उत्पादकांना त्याचा लाभ मात्र मिळेनासा झाला आहे.‘नॅशनल हॉटिकल्चर बोर्डा’च्या अहवालानुसार देशात सध्या फळे आणि भाजीपाला साठवण्यासाठी ३१.६३ दशलक्ष मे.टन क्षमतेची ६ हजार ७८६ शीतगृहे उपलब्ध आहेत. त्यापैकी केवळ ६ लाख ७७ हजार मे.टन क्षमतेची ५११ शीतगृहे राज्यात आतापर्यंत उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्रात शीतगृहांची संख्या अधिक दिसत असली, तरी इतर काही राज्यांच्या तुलनेत शीतगृहांची क्षमता अत्यंत कमी आहे. क्षमतेच्या उतरंडीवरील पहिल्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक अव्वल आहे. सर्वाधिक फळांचे उत्पादन घेऊनही शीतगृहांअभावी फळांची नासाडी होण्यासोबतच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची चांगली किंमत मिळू शकत नाही. हा खरा प्रश्न आहे.  
वेगवेगळया संस्थांनी अधिकाधिक शीतगृहे उभी करावीत यासाठी केंद्र सरकार ५० टक्के अनुदान देत आहे, पण पुरेशा संख्येत राज्यात शीतगृहांची साखळी उभी राहिलेली नाही. फळे, बटाटे, कांदे अशा प्रत्येक शेतमालासाठी वेगवेगळया प्रकारच्या शीतगृहांची गरज असते. राज्यात उत्पादित होणाऱ्या फळांसाठी शेतकऱ्यांना मदत होईल, या दृष्टीकोनातून सहकारी तत्त्वावर शीतगृहांची साखळी उभी होणे गरजेचे होते,पण त्याकडे दुर्लक्ष झाले. शेतमाल काही महिने साठवून योग्य वेळी विक्रीला यावा, म्हणून शीतगृहांची व्यवस्था असते, शेतकऱ्यांना अशा नाशवंत मालाच्या साठवणुकीसाठी बँका पतपुरवठा करीत नाहीत. त्यामुळे शेतकरी स्वत:च्या ताकदीवर शेतमाल साठवू शकत नाहीत. शीतगृहांना मात्र बँका पतपुरवठा करीत असल्याने शीतगृहांचे मालकच शेतमाल कमी दराने खरेदी करतात आणि नंतर चांगले भाव आले की तो विक्रीला काढतात.
‘नॅशनल सेंटर फॉर कोल्ड चेन डेव्हलपमेंट’ने केलेल्या अभ्यासानुसार महाराष्ट्रात ६२.७३ लाख मे.टन क्षमतेच्या शीतगृहांची आवश्यकता आहे, पण उपलब्ध क्षमता  केवळ ६ लाख ७७ हजार मे.टन आहे.
एकीकडे फळपिकांचे भरघोस उत्पादन मात्र दुसरीकडे साठवणुकीची व्यवस्था नाही, अशी विपरित स्थिती महाराष्ट्रात आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, पंजाब,आंध्रप्रदेश या राज्यांनी शीतगृहांची साखळी उभारून फळे आणि भाजीपाल्याची नासाडी कमी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. राज्यात शीतगृहांची साखळी मजबूत झाल्यास फळे आणि भाजीपाल्याची नासाडी कमी होणार आहे. शेतकऱ्यांना शेतमालाचे आणि ग्राहकांना वस्तूंचे योग्य दर मिळू शकतील. शीतगृहांसाठी अपारंपारिक उर्जास्त्रोतांचा वापर केल्यास आर्थिकदृष्टय़ा अधिक फायदा होऊ शकेल. कृषी मालाला सहीसलामत बाजारपेठेत पोहचवण्यासाठी शीतकरण संयंत्रे असलेल्या वाहनांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरावे लागेल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.