भाजप खासदार नाना पटोले यांनी वेगळ्या विदर्भाचा ठराव संसदेत मांडल्याचे पडसाद शुक्रवारी विधान परिषदेत पाहायला मिळाले. विरोधकांनी हा मुद्दा लावून घोषणाबाजी केल्यामुळे सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला. भाजप सरकारला महाराष्ट्र तोडायचा आहे का, असा सवाल उपस्थित करत मुंडे यांनी स्वतंत्र विदर्भासंदर्भातील भूमिका स्पष्ट करण्याची मागणी सरकारकडे केली. गेल्या दोन दिवसांपासून मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून विधान परिषदेचे कामकाज सातत्याने तहकूब करावे लागते आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यातच आता वेगळ्या विदर्भाच्या प्रस्तावावरून पुन्हा एकदा सरकारपुढील अडचणीत वाढ झाली आहे. विधान परिषदेमध्ये सरकारकडे बहुमत नाही. त्यातच वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला सातत्याने बॅकफुटवर जावे लागते आहे. त्यातच आता वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यामुळे सरकारपुढील अडचणी वाढणार आहेत.