सव्वाचार लाख ग्राहकांकडून अ‍ॅप डाऊनलोड

राज्यभरातील वीजग्राहकांसाठी महावितरणने नुकत्याच उपलब्ध करून दिलेल्या अद्ययावत मोबाइल अ‍ॅपला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चार लाख ३८ हजार ४३९ वीजग्राहकांनी  हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. वीजग्राहकांना विविध सेवांतर्गत ऑनलाइन विशेषत: मोबाइलवर उपलब्ध व्हाव्यात म्हणून हे मोबाइल अ‍ॅप महावितरणने सुरू केले आहे. या माध्यमातून महावितरणच्या सेवा आता आपल्या बोटांवर आल्या आहेत.

या अ‍ॅपवर वीजबिल पाहणे, ते ऑनलाइन भरणे आदी महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध केल्या केल्या आहेत. वीजबिले भरण्यासाठी नेटबँंकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिटकार्डासोबतच मोबाइल व्ॉलेट, कॅश कार्डचा वापर करता येतो. एकापेक्षा जास्त वीजजोडण्या असतील, तर ते एकाच खात्यातून (युजरनेम) हाताळता येतात. विजेसंबंधीच्या सर्व प्रकारच्या तक्रारी नोंदविणे तसेच त्यांची सोडवणूक झाली की नाही, याची खातरजमा करता येते. यापुढे ग्राहकांना मोबाइलवर वीजबिलाचे संदेश पाठविले जाणार आहेत. त्यासाठी ग्राहकांना त्यांचे मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी नोंदविण्यासाची व ते अद्ययावत करण्याची सुविधा या अ‍ॅपमध्ये दिली आहे.

ज्या ग्राहकांचे मीटर रिडिंग महावितरणला मिळाले नाहीत, अशा ग्राहकांना कंपनीकडून नोंदविलेल्या मोबाइलवर संदेश जाईल. त्यानंतर त्या ग्राहकाला आपल्या वीज मीटरचा फोटो काढून रििडग नोंदविण्यासाठी सुविधा उपलध्द होतील. त्यामुळे वीजबिलांमधील चुका कमी होऊन ग्राहक तक्रारीही कमी होतील, असा दावा महावितरणने केला आहे.

या मोबाइल अ‍ॅपमध्ये वीज जोडणीसाठी अर्ज करण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे हे मोबाइल अ‍ॅप ग्राहकप्रिय ठरले असून आतापर्यंत चार लाख ३८ हजार ४३९ वीजग्राहकांनी ते डाऊनलोड केले आहे. वीज ग्राहकांसह महावितरण कर्मचाऱ्यांनाही मोबाइल अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अ‍ॅपवर ग्राहकांना सेवांबद्दलचा अभिप्राय देखील नोंदविता येतो.

ग्राहकांसाठीचे अ‍ॅप ‘गुगल प्ले स्टोअर’, ‘अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर’, ‘विंडोज स्टोअर’ तसेच महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ते अ‍ॅन्ड्राइड, विंडोज व आयओएस ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करते.