काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांची साथ सोडून शिवसेनेत जाऊन शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून सेनेकडून उमेदवारी दाखल केलेले महेश कोठे यांनी शहर उत्तर मतदारसंघातही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. यापैकी नेमक्या कोणत्या मतदारसंघात उभे राहायचे, याचा फैसला कोठे हे उद्या मंगळवारी घेणार आहेत.
शिवसेना-भाजप युती असताना सोलापूर शहर उत्तरची जागा भाजपकडे तर शहर मध्यची जागा सेनेकडे होती. महेश कोठे यांनी मागील २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरमधून काँग्रेसच्या तिकिटावर लढत दिली होती. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे व कोठे यांच्यात बेबनाव निर्माण होऊन कोठे हे शिंदे यांची साथ सोडत सेनेत दाखल झाले. त्यांना अर्थात सेनेच्या मतदारसंघात म्हणजे शहर मध्यमध्ये उभे राहावे लागले. परंतु त्याच सुमारास शिवसेना-भाजप युती फुटल्याने नवीन राजकीय समीकरणे पुढे आली.
या पाश्र्वभूमीवर कोठे यांना त्यांच्या पूर्वीच्या शहर उत्तरमधून उभे राहण्याचा आग्रह समर्थकांनी केला. त्याप्रमाणे कोठे यांनी शहर मध्यसह शहर उत्तरमध्येही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोन्ही जागांपैकी नेमक्या कोणत्या जागेवर उमेदवारी कायम ठेवायची, याचा निर्णय कोठे हे उद्या घेणार आहेत. शहर उत्तरमधून अपक्ष उमेदवारी ठेवायची तर शहर मध्य मतदारसंघातील सेनेकडून मिळालेल्या उमेदवारीवर पाणी सोडणार की शहर उत्तरमध्ये अपक्ष उमेदवारी शिवसेना पुरस्कृत ठेवणार, याबाबत कोठे यांच्या भूमिकेकडे सर्वाच्या नजरा वळल्या आहेत. शहर उत्तरमध्ये सेनेकडून माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी उमेदवारी दाखल केली आहे.