उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया एकदाची पूर्ण झाली. परंतु निवडून कोण येणार याबाबतचे तर्क-वितर्क, दावे-प्रतिदावे आणि पजांना उधाण आले आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का चांगलाच वधारला आहे. मागील निवडणुकीत ५७.५९ टक्के मतदान झाले होते. यंदा सहा विधानसभा मतदारसंघातून ६४.४१ टक्के मतदान नोंदविले गेले. मतदानानंतर दुसऱ्या दिवशी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार ‘नॉट रिचेबल’ होते.
 मागील लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या १६ लाख ३ हजार ३९३ एवढी होती. यंदा त्यात वाढ होऊन मतदारांची संख्या १७ लाख ३२ हजार ५७४ एवढी झाली. नवमतदारांची वाढलेली संख्या लक्षणीय होती. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण ११ लाख १५ हजार ९९१ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यात ६ लाख ११ हजार २११ पुरुष तर ५ लाख ४ हजार ४६५ महिला मतदारांचा समावेश आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारांची संख्या होती. तेथून ३ लाख २० हजार ३३० मतदारांपकी २ लाख ८ हजार ५३८ जणांनी मतदान केले. मतदारसंघातील झालेल्या मतदानाची आकडेवारी ६५.१० टक्के एवढी आहे. तुळजापूरबरोबरच औसा मतदारसंघातूनही सर्वाधिक मतदान झाले आहे. २ लाख ५० हजार ६५३ मतदारांपकी १लाख ६५ हजार ५१ जणांनी आपल्या मताचा कौल यंत्रबंद केला आहे. औसा मतदार संघात ६५.८५ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील टक्का चांगलाच वधारला आहे. मागील निवडणुकीत ५८.६८ टक्के मतदान नोंदविण्यात आले. यंदा ६५.७२ टक्के मतदारांनी मतदान केले. ३ लाख १७ हजार ८४२ मतदारांपकी २ लाख ८ हजार ८८४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. उमरगा विधानसभा मतदारसंघात ६२.८२, परंडा ६४.३६ तर बार्शी विधानसभा मतदारसंघातून ६२.४३ टक्के मतदारांनी मतदान केले.
मतदारसंघात १६ तृतीयपंथी मतदार आहेत. त्यापकी १५ जणांनी आपल्या मताचा अधिकार बजावला.  
सर्वच मतदारसंघातून वधारलेला टक्का कोणाच्या मुळावर आणि कोणाच्या पथ्यावर पडणार याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. दरम्यान ज्या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये रंगतदार लढत झाली, ते खासदार डॉ. पद्मसिंह पाटील व प्रा. रवींद्र गायकवाड यांनी मतदानानंतर दुसऱ्या  दिवशी दिवसभर काय केले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.